जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनानिमित कर्वे समाज सेवा संस्थेमार्फत विविध उपक्रम
पुणे- “स्किझोफ्रेनिया” या मानसिक आजाराच्या जनजागृतीसाठी जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनानिमित कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रम विभागामार्फत दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येत असून यावर्षी प्रामुख्याने “स्किझोफ्रेनिया” मुळे स्वत्व हरवून घराबाहेर पडत वर्षानुवर्षे रस्त्यावर फिरणार्या मनोरुग्णांना उचलून त्यांच्यावर उपचार व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पुणे शहरातील नागरिकांची जागृती करीत रस्त्यावर फिरणाऱ्या सात (७) मनोरुग्णांना उचलून त्यांची पुढील उपचार व पुनर्वसनासाठी कर्जत येथील “श्रद्धा” पुनर्वसन केंद्रामध्ये मध्ये रवानगी करण्यात आली आहे.
जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनानिमित यावर्षी कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रम विभाग व कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर,प्रा चेतन दिवाण, प्रा महेश ठाकूर व श्रद्धा पुनर्वसन केंद्राचे प्रमुख डॉ भरत वाटवानी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून “स्किझोफ्रेनिया” संबंधी ठिकठिकाणी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले त्यातीलच एक प्रमुख उपक्रम म्हणून रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांचे उपचार व पुनर्वसन यासंबंधी जनजागृती करीत मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याचे प्रा चेतन दिवाण यांनी सांगितले.
स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारामुळे घरातून बाहेर पडून तीन वर्षाहून अधिक काळ पुणे शहरामधील रस्त्यावर फिरणाऱ्या ओबेद या मनोरुग्णाला कर्वे – श्रद्धा च्या टीम ने गत महिन्यामध्ये उचलून उपचार व पुनर्वसन करण्यासाठी कर्जत येथील केंद्रामध्ये रवानगी केली होती त्याच्यावर उपचार करून त्याला काल स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनाचे औचित्य साधून घरी सोडण्यात आले. तसेच पुणे शहरामध्ये फिरणाऱ्या इतर चार पुरुष व तीन महिला मनोरुग्णांना काल उचलण्यात आले असून त्यांच्यावर कर्जत येथील श्रद्धा च्या पुनर्वसन केंद्रामध्ये उपचार करण्यात येणार आहेत.
स्किझोफ्रेनिया आजार जडल्यानंतर घर सोडून निघून जात वर्षानुवर्षे रस्त्यावर फिरून कचराकुंडीतल्या अन्नावर पोट भरून जगणाऱ्या हजारो मनोरुग्णांना आधार देऊन त्यांच्यावर मोफत उपचार करीत पुनर्वसन करणाऱ्या “ श्रद्धा पुनर्वसन केंद्रा” चे प्रमुख व प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ भरत वाटवानी यांच्या श्रद्धा पुनर्वसन केंद्रास रविवारी दि. २७ रोजी कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी भेट देणार असून प्रा. चेतन दिवाण यांच्याकडून डॉ भरत वाटवानी यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे.

