पुणे: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्त्री शिक्षणाबरोबरच वंचित व शोषित घटकांच्या उन्नतीसाठी शिक्षणाचा वसा घेऊन पुण्यात शिक्षण संस्था उभ्या करणाऱ्या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या नावे समाजकार्याचे महाविद्यालय स्थापन करून व्यावसायिक समाजकार्यकर्त्यांची एक फळी उभी करणाऱ्या कर्वे समाज सेवा संस्थेच्या वतीने यावर्षीपासून प्राथमिक शिक्षण देखील उपलब्ध केले असून महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या प्ले ग्रुप ते इयत्ता चौथीपर्यंतच्या “ विवेक वर्धिनी” या प्राथमिक शाळेची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे सचिव एम. शिवकुमार यांनी दिली आहे.
कर्वे समाज सेवा संस्थच्या वतीने १९६३ साली महर्षी कर्वे यांच्या नावे समाजकार्य महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली व काही वर्षातच नावारूपास आलेल्या संस्थेच्या या समाजकार्य महाविद्यालयाने समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे तर देशपातळीवरील प्रथम दहा महाविद्यालयांपैकी एक असा बहुमान मिळविण्याची किमया केली आहे. कर्वे समाज सेवा संस्था ही गेली ५५ वर्षे शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये देखील अविरत कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजातील सर्व घटकांना त्याचा फायदा पोहोचावा यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षणाचे माहेरघर असणार्या पुणे शहरामध्ये दर्जेदार प्रतीचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचे आव्हान समाजकार्याचा वसा असणार्या कर्वे समाजसेवा संस्थेने स्वीकारले असून यावर्षीपासून हिंगणे- कर्वेनगर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्ले ग्रुप, नर्सरी, जुनिअर व सिनिअर केजी तसेच पहिली ते चौथी पर्यंतच्या इंग्रजी माध्यमाच्या “विवेक वर्धिनी” या प्राथमिक शाळेची सुरुवात करण्यात आली आहे.
समाजकार्याचा वसा असणार्या व आधुनिक सोयी सुविधांनी तसेच अद्ययावत असणार्या या शाळेमध्ये माफक दरामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु असून अधिक माहिती व प्रवेशासाठी कर्वे समाज सेवा संस्थेच्या कर्वेनगर येथील वनदेवी मंदिराशेजारील १८, हिल साइड येथील “विवेक वर्धिनी” शाळेच्या कार्यालयाशी ०९८८१८१६६६२ व ०९८८१८१६६६३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सचिव एम. शिवकुमार यांनी केलेले आहे.

