पुणे: येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या वतीने कोरोना व्हायरस संक्रमण नियंत्रण व कोरोनामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यभरातील जनतेमध्ये कोरोनाबाबत जनजागृतीबरोबरच विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले असून विशेष म्हणजे प्रशासनास मदत म्हणून पुणे महानगर पालिका प्रशासनाच्या मदतीने कर्वेनगर परिसरातील निराधार, बेघर, मजूर व गरजुंची व्यवस्था करण्यात आलेल्या सम्राट अशोक विद्यामंदिरामधील सुमारे ६० लोकांना सकाळचा चहा – नास्ता, दुपारचं जेवण,संध्यकाळचा चहा व रात्रीच्या जेवणाची सोय करण्यात करण्यात आली आहे. तसेच त्यांना आरोग्य व मानसिक आरोग्य सेवा सुविधा पुरवठा, उचित मार्गदर्शन व समुपदेशन आदी सेवा देखील पुरविण्यात येत आहेत तसेच मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या भारत सरकारच्या अखत्यारीतील कंपनीच्या मदतीने ठाणे जिल्ह्यातील शहापूर- खराडी आदिवासी भागातील सुमारे 416 आदिवासी बांधवांना महिना भर पुरेल असा किराणा माल पुरविण्यात आला आहे.
कर्वे समाज सेवा संस्था ही देशातील एक अग्रगण्य समाजकार्य महाविद्यालय असणारी नामांकित संस्था असून संस्थेमार्फत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात
नुकत्याच महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन गेलेल्या पुराच्या थैमानादरम्यान सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील पूरग्रस्तांसाठी संस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तूंचे व शालेय साहित्याचे वाटप तसेच पुरभागातील जनतेचे समुपदेशन करण्याचा उपक्रम देखील राबविण्यात आलेला होता
संस्थेचे मुख्य विश्वस्त व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक व प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्वे समाज सेवा संस्थेचे समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी हे कोरोनासंबंधी शासन व संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले असून महाराष्ट्र राज्यातील अनेक शहरे वं ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन तसेच ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना विविध प्रकारचे मार्गदर्शन व मदत करण्याचे काम करीत आहेत. संस्थेच्या उपक्रमांमध्ये कोरोना बाबतीत जनजागृती, मदत शिबिरे, भोजन व्यवस्था, आरोग्य व मानसिक आरोग्यासंबंधी ऑनलाईन मार्गदर्शन, कोरोना व लॉकडाऊन कालावधीमधील सकारात्मक व नकारात्मक मते/ विचार जाणून घेण्याचा अभ्यास, शहापूरच्या आदिवासी भागामधील आदिवासी बांधवाना मास्क व कागदी पिशव्यांचे वितरण आदी उपक्रमांचा समावेश असून संस्थेचे मुख्य विश्वस्त व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक, प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर, सचिव शिवकुमार मदिराला , सदस्य विनायक कराळे, हयाच्या मार्गदर्शन खाली बालाजी तेलकर, वैजिनाथ बिरादार तसेच समन्वयक प्रसाद कोल्हटकर व प्रा चेतन दिवाण हे या कार्याचे नियोजन व अंमलबजावणी करीत आहेत
कर्वे समाज संस्थेचे प्रा चेतन दिवाण हे महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य जनजागृती समितीचे सचिव तथा समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडत असून त्यांनी राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्त श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांच्या मदतीने दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांसाठी कोरोनाबाबत शास्त्रीय माहिती, कोरोना संबंधी विविध शंकांचे निरसन, समुपदेशन व मानसिक व भावनिक आधार देण्यासाठी तसेच याबाबत ऑनलाईन पद्धतीने मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन कक्ष उभारून राज्यभरातील जनतेला या ऑनलाईन हेल्पलाईन द्वारे मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या सर्व उपक्रमांमध्ये कर्वे समाज सेवा संस्था ही पुणे पोलीस आयुक्तालय, पुणे महानगरपालिका व दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे तसेच माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड या शासकीय संस्थांच्या सहकार्याने काम करीत असून गरज भासल्यास शहरातील विविध ठिकाणी वस्तू व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, मास्क वाटप, कोरोना सोसायट्यां मध्ये प्रत्यक्ष समुपदेशन वेळप्रसंगी विलगिकरण वॉर्ड ची सेवा देखील उपलब्ध करून देऊन प्रशासनाला मदतीचा हात देणार असल्याचा मानस संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक व प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे

