मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले दिग्दर्शक, अभिनेते अजय फणसेकर पुन्हा एकदा एक आगळा वेगळा विषय घेऊन “चीटर” या सिनेमाच्या माध्यमातून भेटीला येणार आहेत. याआधी अजय फणसेकरांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रात्र आरंभ’ ‘एनकाऊंटर’, यही है जिंदगी, “एक होती वादी’, रामचंद्र पुरुषोत्तम जोशी’ सिनेमांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.
स्वीस एन्टरटेनमेंट प्रा, लि. च्या. फुरखान खान, प्रदीप शर्मा यांची प्रस्तुती असलेला, निर्माते प्रविणकुमार उदयलाल जैन यांची निर्मिती असलेल्या ‘चीटर’ सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अजय फणसेकर यांचे असून बी. लक्ष्मण ह्यांनी या सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पहिले आहे. अभिनेता वैभव तत्ववादी, हृषीकेश जोशी, अभिनेत्री पूजा सावंत, आसावरी जोशी, सुहास जोशी, वृषाली चव्हाण आणि जीवन कालारकर अशी या सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे.
पुण्यातील अग्निहोत्री ह्या ब्राम्हण, सुसंकृत घराण्यातील अभय अग्निहोत्री (वैभव तत्ववादी) हा मुलगा घराण्यामधील वातावरणाच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा असतो. खोटे बोलून फसवणे हा त्याचा जणू धंदाच असतो. मॉरिशियस येथे बॉब साटम ( हृषीकेश जोशी ) हे मोठे उद्योगपती असून ते आपल्या कुटूंबासोबत तेथे रहात असतात, ते स्वतः खूप वर्षापूर्वीचा एक मोठा व्हिला मॉरिशियस येथे विकत घेतात. त्यांच्या आई (सुहास जोशी) ची इच्छाअसते की आपल्या नातीने मराठी संस्कृती जाणुन घेतली पाहिजे त्यासाठी ते आपल्या नातीला म्हणजेच मृदुला (पूजा सावंत) ला शिकण्यासाठी पुण्यात पाठवितात, मुदुलाची पुण्यात अभय बरोबर ओळख होते, कालाताराने या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते. अभय तिच्याबरोबर सुद्धा चीटींग करीत असतो, त्यानंतर अशी काही घटना घडते की त्या घटनेनंतर त्याला मॉरिशियसला जावे लागते. त्याच्या या चीटींग करण्याच्या स्वभावामुळे तो स्वतःच कधी जाळ्यात अडकतो की….?? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला “चीटर“ हा सिनेमा पहावा लागणार आहे
दिग्दर्शक अजय फणसेकरांनी सांगितले की, ह्या चित्रपटाचे ८० टक्के चित्रिकरण हे मॉरिशियस येथे झाले असून उर्वरित चित्रीकरण हे पुणे येथे झाले आहे ह्या सिनेमातील कलाकार आणि निर्माते यांचे संपूर्ण सहकार्य मला खूप मिळाले, तेथे चित्रिकरण करताना नैसर्गिक अडचणी आल्या त्यावर मात करून आम्ही सर्वांच्या सहकार्याने पूर्ण केले, खरतर आजवर केलेल्या माझ्या सिनेमांपेक्षा ह्या सिनेमाचा जॉनर हा पूर्णपणे वेगळा असून मी पहिल्यांदाच हाताळला आहे आणि प्रेक्षकांना नक्कीच पसंतीस उतरेल अशी मला आशा आहे.
“चीटर” सिनेमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी पहिल्यांदाच एकाच मराठी सिनेमासाठी दोन गाणी गायली आहेत.
सोनू निगम आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी या सिनेमाचे शीर्षक गीत गायले असून गायिका उर्मिला धनगरच्या आवाजातील “ झाकरी “ नृत्यावर आधारित एक गीत हे या सिनेमाचा आकर्षणाचा भाग आहे.
“चीटर” या सिनेमाचे संगीत नव्या दमाच्या अभिजीत नार्वेकर या तरुणाने दिले असून सिनेमातील गाणी ही अखिल जोशी या नवोदित तरुणाने लिहिली आहेत. व्ही,एफ,एक्स्चे काम हे या सिनेमातील मुख्य असून हेमंत शिंदेने हे शिवधनुष्य उत्तमरीत्या पेलले आहे. सिनेमाचे संकलन विनोद पाठक, कला दिग्दर्शन स्वप्नील केणी, नृत्ये वृषाली चव्हाण, अमित बाईंग तर कार्यकारी निर्माते समीर शेख हे आहेत.
तर असा हा आगळा वेगळ्या धाटणीचा “चीटर” सिनेमा येत्या १३ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.