चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

पुणे, दि.26, ‘चेस दी व्हायरस’ संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे सांगतानाच ‘चेस दी वायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उप मुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण झाले. कार्यक्रमास महापौर उषा ढोरे, खा. श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे, खा. सुप्रियाताई सुळे, आ. माधुरीताई मिसाळ आदी मान्यवर या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.
“शाब्बास पुणेकर” .. तुम्ही दिलेल्या वेळेत भव्य असे कोविड रुग्णालय उभारले आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या संकटाला न घाबरता आपण सामोरे जात आहोत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातही अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा तसेच वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधीत असलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्या. ‘चेस दी व्हायरस’ याप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, हीच संकल्पना आपण राज्यभरात राबविणार आहोत, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. पुण्यातील या कोविड रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. पावसाळयाचा कालावधी असल्याने कोरोनासोबतच साथीच्या आजाराची शक्यता विचारात घेत दक्षता घेण्याची गरज आहे. कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे, त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, असे सांगतानाच कोरोनाचे निदान करण्यासाठी आवाजावरून चाचणी मुंबईत सुरू केली आहे, ही चाचणी यशस्वी झाली तर कोरोना निदानाच्या मोहिमेत आपण मोठा टप्पा गाठू शकू, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले, पुणे शहर व जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. पाऊस सुरू असताना अत्यंत कमी कालावधीत या कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. या रुग्णालयामुळे कोविड रुग्णाला वेळेत उपचार मिळणे सुलभ होणार असून पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील रुग्णाला या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी या दोन्ही जम्बो रुग्णालयांची सेवा महत्त्वाची ठरणार आहे. कोरोनविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे, त्यामुळे यापुढेही प्रत्येकाने नियमांचे अत्यंत काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. ‘चेस दी व्हायरस’ मोहीम सुरू केली असून, कोरोना निदानासाठीच्या चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. निदान व उपचार वेळेत होतील याकडे विशेष लक्ष असून लवकरच राज्य कोरोनामुक्त होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्राने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. राज्यात कोरोना निदानासाठी सर्वाधिक चाचण्या पुणे जिल्हयात होत आहेत, त्यामुळे वेळेत निदान व वेळेत उपचार मिळत असून पुण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी जम्बो रुग्णालय महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर उषा ढोरे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालय निश्चित उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, पुणे जिल्हयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत पुणे शहरासोबतच पिंपरी-चिंचवडमध्येही जम्बो रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. जम्बो सुविधेमुळे बेड उपलब्धता वाढणार असून कोरोनाबाधित शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमात जम्बो कोविड रूग्णालयाच्या उभारणीवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. आभार सुहास दिवसे यांनी मानले.
रुग्णालयाविषयी – अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी येथे 816 खाटांचे स्वतंत्र कोवीड- 19 रुग्णालय उभारण्यात आले आहे. यामध्ये 616 ऑक्सिजन युक्त खाटा व 200 आयसीयू खाटांची सुविधा आहे. रुग्णालयामध्ये कोवीड -19 संबंधी अद्ययावत उपकरणे व सुविधा उपलब्ध आहेत. 3 हजार 900 चौरस मीटर आयसीयू निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित केले आहे. रुग्णालयाचे एकूण क्षेत्रफळ ११ हजार ८०० चौरस मीटर इतके आहे. 20 हजार चौरस मीटर जमिनीचे विकसन करण्यात येत असून या साठी 4 हजार किलो वॅट विद्युत पुरवठा देण्यात आला आहे. 25 हजार लिटर क्षमतेचे लिक्वीड ऑक्सिजन मेडिकल टॅंक आहेत.रुग्णालयाचे काम 6ऑगस्ट 2020 रोजी चालू झाले.आजच्या तारखेला 200 आयसीयू खाटा व 616 खाटा यांचे काम पूर्ण व टेस्टिंग चालू आहे.हे आयसीयू महाराष्ट्रातील निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे. हे रुग्णालय उभारण्याचा व 6 महिने चालवण्याचा अंदाज खर्च 85 कोटी इतका अपेक्षित आहे. अग्निशमन, पेसो (पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा )इत्यादी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाचा खर्च 50 टक्के राज्य शासन व 50 टक्के पुण्यातील स्थानिक शासकीय संस्थांमार्फत करण्यात येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...