नवी दिल्ली : नजरचुकीने एलओसी पार करुन पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान महाराष्ट्राचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. चंदू बाबूलाल चव्हाण असं या जवानाचं नाव असून ते मूळचे धुळ्याचे आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.दरम्यान, त्याला पाकिस्तानमध्ये पकडून ठेवल्याचे वृत्त कळताच त्याची आजी लीलाबाई चिधू पाटील यांचे आज (शुक्रवार) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले चव्हाण हे लहान असतानाच त्यांच्या आई – वडिलांचे अकाली निधन झाले. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या मोठ्या भावाचा सांभाळ त्यांच्या आजीने (आईची आई) केला. चव्हाण यांचे मोठा भाऊ भूषण हेसुद्धा भारतीय सैन्यात जामनगर येथे कार्यरत आहेत.
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय जवानाने नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी पार केल्याचं वृत्त गुरुवारी संध्याकाळी आलं होतं. टट्टापानी इथे या चंदू चव्हाण यांनी एलओसी पार केली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं. पाकिस्ताने त्यांना अज्ञातस्थळी ठेवलं आहे.चंदू चव्हाण हे मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचे आहेत. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते. 22 वर्षीय चंदू यांनी दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. जवान चंदू चव्हाणसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. चंदू चव्हाण यांची पाकिस्तानच्या ताब्यातून लवकरात लवकर सुटका करा, अशी मागणी त्यांनी राजनाथ सिंहांकडे केली.दरम्यान, चंदू चव्हाण यांना परत आणण्याचे पूर्ण प्रयत्न सुरु असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. त्याचबरोबर डीजीएमओ रणबीर सिंह यांनी देखील पाकिस्तानला याबाबत मााहिती दिली आहे.

