मुंबई: विधानसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्षच क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, राज्यात भाजपशिवाय कोणीही सरकार बनवू शकत नाही, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
भाजपा, महाराष्ट्रची प्रदेश बैठक मुंबईत शुक्रवारी झाली. बैठकीच्या कामकाजाची माहिती मा. प्रदेशाध्यक्षांनी समारोपानंतर पत्रकारांना दिली. त्यावेळी ते बोलत होते.
भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीचा समारोप केला. ते म्हणाले की, आगामी पाच वर्षात देशात पायाभूत क्षेत्रात शंभर लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यामुळे देशामध्ये व्यवसायाला व रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रचंड वेगाने पुढे जाईल. त्याच दिशेने जाण्यासाठी महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे व तसे सरकार नक्की स्थापन करू, असा विश्वास आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात झालेल्या पावसामुळे 325 तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजपाच्या लोकप्रतिनिधी, नेते व कार्यकर्त्यांनी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच भाजपाच्या संघटन पर्वात पक्षाची बूथपातळीपासून मजबूत बांधणी करावी, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार व जिल्हाध्यक्षांना केल्या.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांना एकूण १ कोटी ४२ लाख मतं मिळाली. पक्षाचे निवडून आलेले १०५ आमदार आणि इतर अपक्ष सहयोगी आमदारांसह भाजपचं संख्याबळ ११९ इतके आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाशिवाय राज्यात कोणीही सरकार बनवू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले की, “राज्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तम असून, आगामी काळात ही रचना अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आजच्या बैठकीत यासंबंधीची रुपरेषा निश्चित करुन, सर्व पदाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.”
“लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल खरेदी प्रकरणातून खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवडणुकीत देशातील सूज्ञ जनतेने राहूल गांधींना अद्दल घडवली. संपूर्ण देशातील जनतेने भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान केले. यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही राहुल गांधींना याप्रकरणी माफी मागायला लावली. न्यायालयाने त्यांचा माफीनामा मंजूर केला. राहुल गांधी यांनी देशातल्या जनतेची दिशाभूल केली आहे. त्यांनी देशातल्या जनतेचीही माफी मागावी, यासाठी भारतीय जनता पक्ष आंदोलन पुकारणार आहे,” असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
समारोप सत्राला व्यासपीठावर भाजपा विधिमंडळ पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस, मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, मा. राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि संजय धोत्रे, पक्षाचे नेते हरिभाऊ बागडे, एकनाथराव खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर व अतुल भातखळकर आणि मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात पक्षाचे राष्ट्रीय निर्वाचन अधिकारी राधामोहनसिंह यांनी संघटनात्मक निवडणुकीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे राज्याचे निवडणूक अधिकारी व प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभा निवडणुकीविषयी विश्लेषण सादर केले. . विजयराव पुराणिक यांनी केंद्र सरकारच्या नागरिकता संशोधन विधेयकाची माहिती दिली. . सुजितसिंह ठाकूर यांनी पक्षाच्या निवडणूक समीक्षा योजनेची माहिती दिली. प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी रामजन्मभूमीविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची सविस्तर माहिती दिली.