वास्तववादी चित्रपटांना मिश्कील विनोदांची किनार जोडत चित्रपट निर्मिती करण्यात मराठी
सिनेसृष्टी अव्वल असल्याचं जगभरात मानलं जातं. समाजात घडणाऱ्या घटनांमधील गांभीर्य तसूभरही
कमी न करता विनोदी अंगाने भाष्य करीत प्रेक्षकांच्या डोळयांत अंजन घालणाऱ्या चित्रपटांची फार मोठी
परंपरा मराठी चित्रपटसृष्टीला लाभली आहे. याच वाटेने जाणारा ‘चालू द्या तुमचं’ हा मराठी
चित्रपट 15 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. प्रवीण मधुकर तायडे, विशाल वसंत वाहूरवाघ
आणि अमोल वसू यांनी ‘ब्लू व्हिजन एंटरटेनमेंट्स’च्याबेनरखाली ‘चालू द्या तुमचं’ या मनोरंजनपर
चित्रपटाची निर्मिती केली आहे. आशयघन चित्रपटाला सुमधुर गीतसंगीता ची जोड देत दिग्दर्शक राजेश
बाळकृष्ण जाधव यांनी या चित्रपटाचं यशस्वी दिग्दर्शन केलं आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकालाच
पावलोपावली नानाविविध संकटांचा सामना करावा लागत असतो, पण या संकटांपुढे हतबल न होता
जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास जगणं सुखकर होतं असा मोलाचा संदेश ‘चालू द्या तुमचं’ या
चित्रपटात देण्यात आला आहे.
ग्लोबलायझेशनची झळ आज शहरासोबतच खेडयांनाही बसू लागली आहे. या गदारोळत
माणूस आपल्या प्राथमिक गरजा काय आहेत हेच विसरू लागला असल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं
आहे. काही स्वार्था व्यक्ती समाजहितोपयोगी गोष्टी करण्याऐवजी स्वतःची तिजोरी भरण्यासाठी समाजाचं
अतोनात नुकसान करीत आहेत. अशा व्यक्तींना परावृत्त करणारी कथा या चित्रपटात अत्यंत मार्मिकपणे
सादर करण्यात आली आहे. केवळ उपदेशाचे डोस पाजून उपयोगाचं नसून, एखाद्या गंभीर मुद्दयावर
विनोदी अंगाने भाष्य केल्यास तो प्रेक्षकांच्या पचनी पडण्यास सुलभ जातो असं दिग्दर्शक राजेश जाधव
यांचं म्हणणं आहे. राजेश जाधव यांनीच ‘चालू द्या तुमचं’ची कथा-पटकथा लिहीली आहे. त्यामुळे
कागदावर लिहिलेलं पडद्यावर कशाप्रकारे सादर केल्यास ते प्रेक्षकांपर्यंत अधिक चांगल्याप्रकारे पोहोचेल हे
त्यांना ठाऊक होतं त्यानुसारच जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.
प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी अचूक कलाकाराची निवड केली जाणं ही ‘चालू द्या तुमचं’ची खासियत
आहे. सर्वच कलाकारांनी आपापल्या प्रतिभाशैलीला साजेसा अभिनय केला आहे. मिलिंद गुणाजी,विजय
कदम, संदिप पाठक, निशा परूळेकर, मेघा घाडगे, अजय जाधव, उमेश मितकरी, वैशाली चांदोरकर, सुधीर
सिन्हा, दिपज्योती नाईक, स्वप्निल बोरकर, कमल आदिब आदी कलाकारांनी या चित्रपटात भूमिका
साकारल्या आहेत. याखेरीज विजय पाटकर, जयराज नायर, राहुल तायडे, मीरा जोशी हे पाहुण्या
कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठीतील आघाडीच्या कलाकारांच्या सहसुंदर अभिनयाला
संवादलेखक संभाजी सावंत यांच्या खुमसदार संवादलेखनाची साथ लाभली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अभिनय
आणि मार्मिक संवादांचा अद्भूत मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळेल. यासोबतच दर्जेदार
निर्मितीमूल्यांच्या बळावर ‘चालू द्या तुमचं’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालण्यात नक्कीच
यशस्वी होईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
गीतकार अविनाश घोडके, हनुमंत येवले आणि आदिती जहागीरदार यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन
केलं असून संगीतकार मधू भोसले आणि अनुराग-चिन्मय यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. विजय
गटलेवार, मुकूंद नितोणे, विभावरी, उत्तरा केळकर, नेहा राजपाल, आदर्श शिंदे या गायकांनी ‘चालू द्या
तुमचं’साठी गायन केलं आहे. दिपाली विचारे, जयेश पाटील आणि भरत जाधव यांनी गीतांची कोरिओग्राफी
केली आहे. सुदर्शन सातपुते यांनी संकलन केलं असून छायांकन राजा फडतरे यांचं आहे. प्रवीण शशिकांत
जगताप निर्मिती प्रमुख आहेत तर महेश गोपाळ भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. संतोष भोसले यांनी
रंगभूषा, मनाली भोसले यांनी केशभूषा तर मीनल भास्कर देसाई यांनी वेशभूषा केली आहे. केशव ठाकूर
यांनी कलादिग्दर्शनाचं काम पाहिलं असून प्रशांत नाईक यांनी या चित्रपटातील साहसदृश्यांचं दिग्दर्शन केलं
आहे.