पुणे, दि.१० फेब्रुवारी: १४ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. भारतातही तो मोठ्या प्र्रमाणात साजरा केल्याचे दिसून येते. त्याच अनुषंगाने देशात ब्रिलियंटाईन डे साजरा करावा. केवळ शारिरीक रुपाला व दिसण्याला महत्व न देता बुद्धिला व स्वतःच्या अस्तित्वाला महत्व दिले जावे. या उद्देशाने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे या वर्षापासून १४ फेब्रुवारी हा दिवस ‘ब्रिलियंटाईन डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे व त्यासाठी ब्रिलियंटाईन स्पर्धा घेण्यात येणार आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सल्लागार व मार्गदर्शक डॉ. संजय उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. संजय उपाध्ये यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती, परंपरा, पौराणिक कथा, अध्यात्म, धर्म, योग, इतिहासाबरोबरच अन्य क्षेत्रातील विषयांना अनुसरून विद्यापीठाने ‘ब्रिलियंटाईन’ या नव्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरूणांना सक्षम करण्यासाठी हा एक अभिनव उपक्रम आहे. यामध्ये वेगवेगळ्या विषयांसहित विज्ञान, राजकारण, क्रीडा, चित्रपट इत्यादी समकालीन विषयांवर ऑनलाइन निबंध, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम एमआयटी डब्ल्यूपीयूच्या पीस स्टडीज विभागाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
स्पर्धेतील प्रथम विजेत्या स्पर्धकांना ‘एमआयटी डब्ल्यूपीयू पीस किंग’ आणि ‘एमआयटी डब्ल्यूपीयू पीस क्वीन’ म्हणून मुकुट घातला जाईल. त्याच बरोबर सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र दिले जाईल. समग्र आयोजनातून दोन मुले आणि दोन मुली अशा चार विजेत्यांना रौप्य पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. हे सहा विजेते एमआयटी डब्ल्यूपीयूच्या विश्वशांती उपक्र्रमांचे नेतृत्व करतील. तसेच, इतर महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रतिनिधित्व करतील.
सोमवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सायं. ५.३० वा. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरुड येथे ‘ब्रिलियंटाईन डे’ हा कार्यक्रम होणार आहे. या मध्ये विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत. या समारंभासाठी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा.डॉ.आर.एम.चिटणीस, दूरदर्शनचे माजी संचालक श्री. मुकेश शर्मा, पीस स्टडीजचे सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ. मिलिंद पात्रे, पीस स्टडीजचे प्रा.आशिष पाटील, स्कूल ऑफ योगाच्या प्रा.मृण्मयी गोडबोले आणि विद्यार्थी प्रतिनिधी प्रणय करकळे आणि वैष्णवी बावठणकर उपस्थित होते.