News

पंतप्रधान मोदी यांनी सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला तेलंगणातील हैदराबादमधील सिंकदराबाद रेल्वे स्थानकात दाखवला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील हैदराबादमधील सिंकदराबाद रेल्वे स्थानकात सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला आज हिरवा झेंडा दाखवला. सिंकदराबाद रेल्वे स्थानकात आल्यानंतर पंतप्रधानांनी सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि गाडीच्या कर्मचारी वर्गाशी तसेच लहान मुलांशी संवाद साधला. पंतप्रधानांचा ट्विटर संदेश – “सिकंदराबाद आणि तिरुपती यांच्या कनेक्टीव्हिटीत वाढ करणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची झेंडा दाखवून सुरुवात.तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या जनतेचे ही गाडी सुरू झाल्याबद्दल मी अभिनंदन करतो.” माहिती तंत्रज्ञानाचे शहर अशी ओळख असलेले हैदराबाद आणि भगवान वेंकटेश्वराचे धाम तिरुपती यांना जोडणारी सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेस ही अवघ्या तीन महिन्यांच्या काळात तेलंगणातून सुरू झालेली दुसरी वंदे भारत रेल्वेगाडी आहे. या रेल्वेगाडीमुळे दोन शहरांमधल्या प्रवासासाठी लागणारा वेळ जवळपास साडेतीन तासांनी कमी होणार असून त्याचा फायदा यात्रेकरूंना होईल.या कार्यक्रमाला पंतप्रधानांसह तेलंगणच्या राज्यपाल डॉ. तमिळसाई सौंदरराजन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणात हैदराबाद इथे 11,300 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तेलंगणाची राजधानी हैदराबाद इथल्या परेड ग्राऊंड इथे 11,300 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली. या प्रकल्पांमध्ये या प्रकल्पांमध्ये हैदराबाद इथल्या बिबीनगर एम्सची पायाभरणी, पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि सिकंदराबाद रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास यांचा समावेश आहे.यावेळी,  रेल्वेशी संबंधित इतर विकास प्रकल्पांचेही त्यांनी लोकार्पण केले.  त्याआधी, पंतप्रधानांनी हैदराबादमधील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी आयोजित सभेत बोलतांना, पंतप्रधानांनी तेलंगणाच्या विकासाला वेग देण्याची संधी आपल्याला मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  तसेच, सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला झेंडा दाखवल्याचा उल्लेख करत, या गाडीमुळे हैदराबादची आयटी सिटी, भगवान व्यंकटेश्वराच्या निवासस्थानाशी, तिरुपतीशी जोडली जाईल, असे सांगितले. "सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस श्रद्धा, आधुनिकता, तंत्रज्ञान आणि पर्यटन या सगळ्यांचा यशस्वी संगम घडवून आणेल”, असे मोदी म्हणाले. . रेल्वे आणि रस्ते वाहतूक तसेच आरोग्य पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित एकूण  11,300 रुपयांच्या विकास प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी तेलंगणातील नागरिकांचे अभिनंदन केले. तेलंगणा राज्य अस्तित्वात येऊन, साधारण दिल्लीतल्या केंद्र सरकारइतकीच वर्षे झाली आहेत, याचे स्मरण करत, या राज्याच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्वांना त्यांनी वंदन केले.  “तेलंगणाच्या विकासाशी जोडली गेलेली इथल्या नागरिकांची  स्वप्ने प्रत्यक्षात उतरवणे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मागचे मूळ तत्व त्यांनी अधोरेखित केले. गेल्या नऊ वर्षांत मांडलेल्या भारताच्या विकासाच्या मॉडेलचा तेलंगणाला जास्तीत जास्त फायदा घेता यावा यासाठी विशेष भर देण्यात आला आहे. शहरांमधील विकासाची उदाहरणे देताना, पंतप्रधानांनी गेल्या नऊ वर्षांत उभारलेल्या 70 किमी मेट्रोचे जाळे आणि हैदराबाद मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट सिस्टम (MMTS) च्या विकासात झालेल्या प्रगतीचा उल्लेख केला.“आज सुरु झालेल्या 13 एमएमटीएस या सेवांचा प्रामुख्याने उल्लेख करत यासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं. हैदराबाद, सिकंदराबाद आणि नजीकच्या जिल्ह्यांतील लाखो नागरिकांना या सेवांचा लाभ होईल आणि नवीन उद्योग केंद्र आणि गुंतवणुकीला देखील चालना मिळेल. असे त्यांनी सांगितले. कोविड-19 मुळे, जगभरातील अर्थव्यवस्थामधे असलेली अनिश्चितता आणि संकटे, दोन देशात सुरु असलेले युद्ध, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर, भारत काही मोजक्या देशांपैकी एक आहे, जिथे आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी  विक्रमी गुंतवणूक आली आहे, असे त्यांनी सांगितले.यावर्षीच्या अर्थसंकल्पात भारतातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 10 लाख कोटी रुपये राखून ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या नऊ वर्षांत तेलंगणाच्या रेल्वे तरतुदीत सतरा पट वाढ झाली असून नवीन रेल्वे लाईन टाकणे, रेल्वे लाईन दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाची कामे विक्रमी वेळेत झाली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.“सिकंदराबाद-महबूबनगर प्रकल्पाचे विद्युतीकरण हे याचे प्रमुख उदाहरण आहे”, असे ते म्हणाले.  यामुळे हैदराबाद आणि बंगळुरूमधील दळणवळण सुधारेल.” सिकंदराबाद रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या मोहिमेचा एक भाग आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. रेल्वेबरोबरच , तेलंगणातील महामार्गाचे जाळे देखील वेगाने विकसित केले जात आहे असे सांगत पंतप्रधानांनी चार महामार्ग प्रकल्पांचा उल्लेख केला ,ज्यांची आज पायाभरणी करण्यात आली. महामार्गाच्या अक्कलकोट-कुरनूल या टप्प्यासाठी  2300 कोटी रुपये , महबूबनगर-चिंचोली या टप्प्यासाठी 1300 कोटी रुपये , कळवाकुर्ती-कोल्लापूर टप्प्यासाठी 900 कोटी रुपये तर खम्मम-देवरापल्ले टप्प्यासाठी 2700 कोटी रुपये खर्च केले जात आहेत असे सांगून  ते म्हणाले की केंद्र सरकार तेलंगणातील आधुनिक महामार्गांच्या विकासाचे पूर्ण ताकदीने नेतृत्व करत आहे . 2014 मध्ये तेलंगण राज्याच्या  स्थापनेपासून  तेथील राष्ट्रीय महामार्गांची लांबी  2500 किलोमीटरवरून दुपटीने वाढली  असून आज 5000 किलोमीटरहून अधिक झाली आहे आणि यासाठी  केंद्र सरकारने 35,000 कोटी रुपये खर्च केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.  ते पुढे म्हणाले की तेलंगणामध्ये 60,000 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांवर काम सुरू असून त्यात तेलंगणाचा कायापालट करणाऱ्या हैदराबाद रिंग रोडचा समावेश आहे. “केंद्र सरकार तेलंगणातील उद्योग आणि कृषी या दोन्ही क्षेत्रांच्या विकासावर भर देत आहे”, असे  मोदी म्हणाले. वस्त्रोद्योग  हा असाच एक उद्योग आहे जो शेतकरी आणि मजूर दोघांनाही बळ देतो, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने देशभरात 7 मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी एक  तेलंगणामध्ये उभारण्यात येणार आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. ते पुढे म्हणाले की, यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. आज एम्स बिबीनगरची पायाभरणी करण्यात आल्याचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, सरकार तेलंगणातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही मोठी गुंतवणूक करत आहे. “आज पायाभरणी करण्यात आलेले हे  प्रकल्प तेलंगणात प्रवास सुलभता, राहणीमान सुलभता आणि व्यवसाय सुलभता वाढवतील ” असे ते पुढे म्हणाले. मात्र, राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे केंद्र सरकारचे अनेक प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाल्याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. यामुळे तेलंगणातील जनतेचेच नुकसान होत आहे याकडे लक्ष वेधून मोदी यांनी विकासाशी संबंधित कामांमध्ये राज्य सरकारने कोणतेही अडथळे येऊ देऊ  नये आणि कामांची गती वाढवावी असे आवाहन केले. देशवासीयांच्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण करण्याला आमच्या सरकारचे प्राधान्य असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधानांनी विकासाच्या प्रगतीमुळे मूठभर लोक खूप संतप्त असल्याचे नमूद केले. घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्यांना देशहित आणि समाजहिताशी काही देणेघेणे नाही, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांसाठी ते अडचणी निर्माण करत आहेत असे पंतप्रधान  म्हणाले.  ते लोक  प्रत्येक प्रकल्प आणि गुंतवणुकीत फक्त त्यांच्या कुटुंबाचे हित पाहतात असे सांगून  पंतप्रधानांनी तेलंगणच्या जनतेला सावधगिरीचा इशारा दिला. भ्रष्टाचार आणि घराणेशाही  यांच्यातील साम्य नमूद करताना पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला की, जेव्हा घराणेशाही असते तेव्हा भ्रष्टाचार वाढायला सुरुवात होते.  "नियंत्रण हा परिवारवाद आणि घराणेशाहीच्या राजकारणाचा मुख्य मंत्र आहे",असे  पंतप्रधान म्हणाले. अशा तत्त्वांवर टीका करत पंतप्रधान म्हणाले की, अशा राज्यकर्त्यांना  प्रत्येक व्यवस्थेवर त्यांचे नियंत्रण ठेवायचे असते  आणि जेव्हा कोणी त्यांच्या नियंत्रणाला आव्हान देते, तेव्हा ते त्याचा तिरस्कार करतात. थेट लाभ हस्तांतरण प्रणाली आणि देशभरात डिजिटल पेमेंटला दिले जात असलेले प्रोत्साहन यांचे  उदाहरण देत पंतप्रधानांनी अशा घराणेशाहीकडे  बोट दाखवले जे कोणत्या लाभार्थ्याला कोणता लाभ मिळेल यावर नियंत्रण ठेवतात . तसेच या परिस्थितीतून उद्भवणारे तीन अर्थ त्यांनी विशद केले. एक ,कुटुंबाचे गुणगान होत राहिले पाहिजे, दुसरा  भ्रष्टाचाराचा पैसा कुटुंबाकडे येत राहिला पाहिजे आणि तिसरा  गरीबांना पाठवलेला पैसा भ्रष्ट व्यवस्थेला  मिळत राहिला पाहिजे. “आज मोदींनी भ्रष्टाचाराच्या या खऱ्या मुळावर हल्ला चढवला आहे. म्हणूनच हे लोक हादरले आहेत आणि जे काही केले जात आहे ते रागाच्या भरात केले जात आहे”,  असे सांगत त्यांनी राजकीय पक्षांचा संदर्भ दिला ज्यांनी निषेध म्हणून न्यायालयात धाव घेतली मात्र त्यांनाच धक्का बसला. “ सबका विकास( प्रत्येकाचा विकास) या भावनेने काम होते तेव्हा राज्यघटनेचे खरे उद्दिष्ट सार्थ ठरते आणि खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होते. 2014 मध्ये घराणेशाहीच्या राजकारणाच्या विळख्यातून मुक्त झालेल्या केंद्र सरकारच्या कामांचा परिणाम संपूर्ण  देश पाहात आहे, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. गेल्या 9 वर्षात 11 कोटी माता, भगिनी आणि कन्यांना शौचालयाची सुविधा मिळाली आहे ज्यामध्ये तेलंगणमधील 30 लाखांपेक्षा जास्त कुटुंबांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली. देशातील 9 कोटींपेक्षा जास्त भगिनी आणि कन्यांना मोफत उज्ज्वला गॅस जोडण्या  मिळाल्या आहेत ज्यामध्ये गेल्या 9 वर्षात तेलंगणमधील 11 लाख गरीब कुटुंबांचा समावेश आहे. आज आपल्या सरकारच्या कार्यकाळात 80 कोटी गरीब जनतेला मोफत रेशन, गरिबांना पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्यात येत आहेत. तेलंगणमधील  एक कोटी कुटुंबांची पहिल्यांदाच जनधन खाती उघडण्यात आली आहेत, तेलंगणमधील अडीच लाख लहान उद्योजकांना कोणत्याही तारणाविना मुद्रा कर्जे मिळाली आहेत, पहिल्यांदाच पाच लाख फेरीवाल्यांना बँकांकडून कर्जे मिळाली आहेत आणि तेलंगणधील 40 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीएम किसान  सन्मान निधी अंतर्गत सुमारे 9 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. पंतप्रधान म्हणाले,“ ज्यावेळी देश तुष्टीकरणापासून( खुशामत) दूर होऊन संतुष्टीकरणाकडे( सर्वांना समाधानी करण्याकडे) जातो तेव्हा खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय जन्माला येतो.” तेलंगणसहित संपूर्ण देशाला संतुष्टीकरणाच्या मार्गावर वाटचाल करण्याची  आणि सबका प्रयाससह विकासामध्ये योगदान देण्याची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले. “ स्वातंत्र्याच्या अमृत काळात विकसित भारताची उभारणी करण्यासाठी तेलंगणचा जलद विकास महत्त्वाचा आहे,” पंतप्रधानांनी तेलंगणच्या पुढील 25 वर्षातील विकासाच्या प्रवासाचे महत्त्व अधोरेखित करत आपल्या भाषणाचा समारोप केला. तेलंगणच्या राज्यपाल डॉ. तामिलीसाई सौंदरराजन, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, केंद्रीय पर्यटनमंत्री जी किशन रेड्डी, मलकाजगिरीचे खासदार ए रेवंत रेड्डी आणि तेलंगण सरकारमधील मंत्री यावेळी उपस्थित होते.    पार्श्वभूमी 720 कोटी रुपये खर्चाने सिकंदराबाद रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शहराचा मानबिंदू असलेल्या स्थानकाच्या इमारतीची अतिशय कलात्मक सजावट करून या स्थानकाचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी  या पुनर्विकासाचे नियोजन केले जात आहे. या पुनर्विकास झालेल्या रेल्वे स्थानकात एकाच जागी सर्व प्रकारच्या प्रवासी सुविधांसह प्रवाशांना रेल्वेमधून प्रवासाच्या इतर पर्यायांच्या दिशेने विनासायास जाता यावे यासाठी मल्टीमोडल कनेक्टिविटीसह द्विस्तरीय रुफ प्लाझा असेल. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी हैदराबाद- सिकंदराबाद ट्वीन सिटी रिजनच्या उपनगरी विभागात प्रवाशांना वेगवान, सुविधाजनक आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय ठरणाऱ्या 13 नव्या मल्टी मोडल परिवहन सेवांना(एमएमटीएस) हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी पंतप्रधानांनी सिकंदराबाद- महबूबनगर प्रकल्पाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचे देखील राष्ट्रार्पण केले. 85 किलोमीटर लांबीच्या मार्गाचा हा प्रकल्प 1410 कोटी रुपये खर्चाने पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कोणताही अडथळा नसलेली दळणवळण व्यवस्था उपलब्ध होईल आणि रेल्वेगाड्यांच्या सरासरी वेगात वाढ होईल. पंतप्रधानांनी हैदराबादमध्ये बिबीनगर येथे एम्सची पायाभरणी केली. देशभरात आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाचा हा दाखला आहे. 1350 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने बिबीनगर एम्सची उभारणी करण्यात येत आहे. बिबीनगरचे एम्स म्हणजे तेलंगणमधील जनतेसाठी समावेशक, दर्जेदार आणि समग्र तृतीयक निगा आरोग्य सेवा त्यांच्या दारापर्यंत आणणारी ही एक ऐतिहासिक सुविधा आहे. पंतप्रधानांनी 7850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची देखील पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे तेलंगण आणि आंध्र प्रदेश याच्या दरम्यानच्या रस्ते दळणवळण सुविधा बळकट होणार आहेत आणि या भागाच्या सामाजिक- आर्थिक विकासाला मदत होणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून ऐतिहासिक हवाई सफर

भारताच्या संरक्षण क्षमतेत जमीन, हवाई आणि समुद्र अशा सर्व सीमांचा विस्तार झाला असून ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे- राष्ट्रपती मुर्मू मुंबई-भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (8 एप्रिल, 2023) आसाममधील तेजपूर हवाई दलाच्या तळावरून सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून ऐतिहासिक हवाई सफर केली. भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर (प्रमुख) असलेल्या राष्ट्रपतींनी वायुसेनेच्या तळावर परत येण्यापूर्वी हिमालयाच्या सफरी बरोबरच ब्रह्मपुत्रा आणि तेजपूर खोऱ्यात सुमारे 30 मिनिटे हवाई सफरीचा आनंद लुटला. 106 स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन नवीन कुमार यांनी विमान उडविले. विमानाने समुद्रसपाटीपासून सुमारे दोन किलोमीटर उंचीवर आणि ताशी सुमारे 800 किलोमीटर वेगाने उड्डाण केले. या अशा प्रकारची हवाई सफर करणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. अभ्यागतांची नोंद ठेवणाऱ्या पुस्तकात, राष्ट्रपतींनी एक संक्षिप्त मनोगत लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या म्हणाल्या, "भारतीय वायुसेनेच्या बलाढ्य सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानात उड्डाण करणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव होता. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. भारताची संरक्षण क्षमता जमीन, हवाई आणि सागरी अशा सर्व सीमांना व्यापून टाकण्यासाठी प्रचंड विस्तारली आहे, याचा मला अभिमान आहे. मी भारतीय वायुसेना आणि तेजपूरच्या तळावरच्या हवाई दलाच्या संपूर्ण टीमचे या सफरीचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करते.”यावेळी राष्ट्रपतींना विमान आणि भारतीय वायुसेनेच्या (IAF) परिचालन क्षमतांबद्दलही माहिती देण्यात आली. राष्ट्रपतींनी भारतीय वायुसेनेच्या (IAF) च्या कार्य सज्जतेवर समाधान व्यक्त केले. सुखोई 30MKI लढाऊ विमानातून राष्ट्रपतींची हवाई सफर घडवणे हा भारतीय सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर या नात्याने सशस्त्र दलांशी संपर्क ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.मार्च 2023 मध्ये, राष्ट्रपतींनी INS विक्रांतला भेट दिली होती आणि स्वदेशी बनावटीच्या विमानातील अधिकारी आणि खलाशांशी संवाद साधला होता.

सकारात्मक विचार ठेवल्यास तणावमुक्ती मिळेल  – राज्यपाल रमेश बैस

मुंबई दि. ७: शरीर, मन स्वस्थ आणि विचार सकारात्मक असल्यास तणावमुक्त जीवन जगता येईल व चेहऱ्यावर प्रसन्नता येईल. आज विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत तणावपूर्ण जीवन जगत...

विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचविणार -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

पालघर दि. ७ : आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती करता यावी यासाठी इंटरनेट, टॅब अशा विविध शैक्षणिक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम...

Popular