मुंबई: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई बँकेची मध्यवर्ती शाखा फोर्ट परिसरात असल्याने तेथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही वर्गातून निवडून आले होते. मात्र, निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित करण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरुच ठेवली होती. दरेकर यांनी ज्या मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुंबै बँकेची निवडणूक लढविली होती त्या प्रतिज्ञा मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखवण्यात आले होते. गेली अनेक वर्षे दरेकर हे बँकेचे अध्यक्ष असून मजूर या वर्गातूनच ते निवडून येत आहेत. मजूर सहकारी संस्थांच्या उपविधित मजुराची व्याख्या दिलेली आहे. अंगमेहनत करणारी व्यक्ती ही मजूर म्हणून गणली जाते. शारीरिक श्रमातून मजुरी करणारा असला पाहिजे, असेही या उपविधीत नमूद आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर कोणत्या अंगाने मजूर वर्गात मोडतात, हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर सहकार विभागाने नुकतीच प्रवीण दरेकर यांना नोटीस पाठवून ‘मजूर असल्याचे सिद्ध करा’, असे आदेश दिले होते.
प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल
Date:

