पुणे- जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कार्ला फाट्याजवळील ही घटना घडली आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 7.30 वाजेदरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेने जात असलेल्या कारमधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार्ला फाटा सोडल्यानंतर रस्त्याच्यामध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरखाली कार घुसली. त्यामुळे कंटेनर जोरात धडक बसली. या अपघातात पाच जणांचा जीव गेला असून, कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कंटेनर खाली अडकलेल्या गाडी आणि मृत प्रवाशांना पोलिसांनी बाहेर काढले. अपघातामुळे काही वेळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.

