पुणे- २३ गावांमध्ये काम करताना प्राधान्याने करावयाची कामे, घनकचरा विषयक कामे याबाबत सविस्तर आढावा वेळीच घेणे आवश्यक असल्याने पुणे महानगरपालिका प्रशासन व २३ गावातील लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तातडीने बोलविण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
दिपाली धुमाळ यांनी या संदर्भात म्हटले आहे कि, महापालिकेच्या हददीत २३ गावांचा समावेश करणेबाबत निर्णय झाला असून २३ गावांमध्ये पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, विद्युत अशा अनेक समस्या प्रलंबित आहेत. सदर गावांमध्ये मोठया प्रमाणात बांधकामे झालेली असून मोठया प्रमाणात लोकवस्ती याठिकाणी झालेली आहे. या गावांमधील समस्यांची त्याठिकाणच्या लोकप्रतिनिधींना माहिती असून पुणे महानगरपालिका प्रशासन व २३ गावातील लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेणे गरजेचे आहे. सध्या सन 2021-2022 चे अंदाजपत्रक तयार करणेची प्रशासकीय कार्यवाही चालू असून २३ गावांतील विकासकामांसाठी तरतूद करणेसाठी २३ गावातील लोकप्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच २३ गावातील बांधकामांना कर आकारणी करणे देखील गरजेचे असून या गावातील स्थानिक नागरिकांकडून कर आकारणीबाबत मागणी होणेस सुरूवात झाली आहे. पुणे महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता २३ गावातील मिळकतीवर कर आकारणीबाबत कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. तसेच समाविष्ट झालेली ११ गावे व नुकतीच समाविष्ट होणारी २३ गावे याठिकाणी झालेली बांधकामे नियमितीकरण/गुंठेवारी करणेबाबत वारवार मागणी होत असून ही बांधकामे नियमित करणे क्रमप्राप्त आहे. सदर बांधकाम नियमितीकरण/गुंठेवारी करणेच्या प्रक्रियेतून महापालिकेस महसूल प्राप्त होवून या गावातील विकासकामांना भरीव तरतूद उपलब्ध होईल.असेही विपक्षनेत्या धुमाळ यांनी म्हटले आहे.

