पुणे-महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या दोन नगरसेवकांच्या एका प्रभागासह ,नगरसेवक पद रद्द झाल्याने नव्याने रिक्त झालेल्या दोन जागा अशा चार जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक एक (अ) आणि प्रभाग क्रमांक २४ (ब) या ठिकाणच्या नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या चार जागांसाठी जून महिन्यांत पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
राज्यभरातील दहा महापालिकांमध्ये जवळपास २० नगरसेवकांची पदे रिक्त असून, त्यासाठीची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे महापालिकेत नव्याने दोन तर रिक्त झालेली दोन अशा चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. पुणे महापालिकेत नव्याने ११ गावांचा समावेश करण्यात आल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात दोन नगरसेवकांची संख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने दोन नगरसेवकांचा एक प्रभाग तयार करण्यात आला असून, या नगरसेवकपदांसाठी निवडणूक होणार आहे.
याशिवाय प्रभाग क्रमांक एकमधील (अ) भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका किरण जठार आणि प्रभाग क्रमांक २४ (ब) मधील ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. या दोन जागांसाठी नव्याने पोटनिवडणुका होणार आहेत. या चारही निवडणुका एकाच वेळी घेण्यात येणार असून, त्यासाठीची
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी १७ मे पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीवर १७ ते २१ मे दरम्यान हरकती-सूचना नोंदविण्याची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर २७ मे ला अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करून ती २९ मे रोजी मतदान केंद्रनिहाय जाहीर करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जून महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यचा असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.