तिसऱ्या दशकाचे युद्ध लढण्यासाठी आणखी हजारो सैनिक पुन्हा पाठवायचे. यापैकी एक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे
सैन्य माघारी:”२० वर्षानंतर अमेरिका लढत असलेले सर्वात मोठे युद्ध संपवण्याची ही वेळ आहे आणि देशासाठी हा योग्य निर्णय आहे”
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ( यांनी सोमवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा आणि अमेरिकन सैन्य बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर देशाला संबोधित केले. अफगाणिस्तानमध्ये अशरफ घनी यांचं सरकार पडून तालिबानच्या हातात संपूर्ण देश गेल्यानंतर बायडेन यांचे हे पहिले भाषण होतं. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराला परत बोलवण्याचा निर्णय योग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
अमेरिकेचा अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा निर्णय आणि काबुलवर तालिबानने मिळवलेले नियंत्रण यामुळे मागच्या दोन दिवसात अफगाणिस्तानात निर्माण झालेली भयावह परिस्थिती जगाने पाहिली. ऑगस्ट अखेरपर्यंत अमेरिकन सैन्य पूर्णपणे अफगाणिस्तानातून माघार घेणार आहे. मागच्या २० वर्षांपासून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात तालिबान विरुद्ध लढत आहे. आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या सर्व परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
अमेरिकेच्या या निर्णयामुळे तिथे पुन्हा एकदा तालिबान राज येणार हे स्पष्ट झाले आहे. अफगाणि नागरिक हवालदिल झाले आहेत.तिथल्या जनतेमध्ये तालिबानची प्रचंड दहशत, भीती आहे. या सर्व परिस्थितीसाठी अमेरिकेला जबाबदार धरले जात आहे. अमेरिकेवर जगभरातून टीका सुरु आहे. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या मुद्यावर मौन सोडले व आपली भूमिका मांडली.
राष्ट्राला उद्देशून केलेल्या १५ मिनिटांच्या भाषणात अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी बोलवण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “अमेरिकन सैन्य माघारी बोलवण्याच्या आधी झालेल्या करारावर कायम राहायचे की, तिसऱ्या दशकाचे युद्ध लढण्यासाठी आणखी हजारो सैनिक पुन्हा पाठवायचे. यापैकी एक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे” असे जो बायडेन म्हणाले.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान बरोबर केलेला करार आपल्याला वारसामध्ये मिळाल्याचे त्यांनी सांगितले. “अमेरिकेच्या पुढच्या राष्ट्राध्यक्षाकडे हा विषय जाण्याऐवजी मी सध्या होणारी टीका सहन करीन” असे बायडेन म्हणाले. “२० वर्षानंतर अमेरिका लढत असलेले सर्वात मोठे युद्ध संपवण्याची ही वेळ आहे आणि देशासाठी हा योग्य निर्णय आहे” असे त्यांनी सांगितले.
अफगाण नेतृत्वावर खापर फोडत बायडन म्हणाले की, अफगाणी नेते आपल्या लोकांच्या भल्यासाठी एकत्र येण्यात अपयशी ठरले आहेत. जेव्हा सर्वात जास्त गरज होती तेव्हा ते आपल्या भविष्यासाठी उभा राहू शकले नाहीत. बायडन म्हणाले की, अमेरिकेचं अफगाणिस्तानमधील युद्ध संपवण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल मला कोणताही खेद नाही. अमेरिकेचे अध्यक्ष पुढे म्हणाले, की “मला माहित आहे की या निर्णयामुळे माझ्यावर टीका केली जाईल, परंतु मी सर्व टीका स्वीकारतो. मी ती पुढच्या अध्यक्षांवर सोडू शकत नव्हतो.. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची योग्य वेळ कधीच आली नसती. हे चार अध्यक्षांच्या कार्यकाळात चालत राहिले आणि मी ते पाचव्यासाठी सोडू शकत नव्हतो. आपण आपल्या सैनिकांना अनंत काळासाठी दुसर्या देशाच्या नागरी संघर्षात ढकलू शकत नाही. आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागणार होता. “

