मुंबई, दि. 11 : कोविडच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांनी समन्वय साधून कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी व कोरोनाग्रस्त परिवारापर्यंत लाभ पोहचवावेत, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे, नाशिक, धुळे, जालना, जळगाव, पालघर जिल्ह्यात दौरे केले होते. त्यावेळी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी विविध सूचना दिल्या.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, कोविडमुळे निराधार झालेल्या महिला आणि बालकांची काळजी घ्यावी. त्यांचे सर्व्हेक्षण करावे. निराधार झालेल्या महिला आणि मुला – मुलींना विविध योजनांद्वारे मदत देण्याच्या काम प्रगतीपथावर आहे हे समाधानकारक आहे परंतु सर्व लाभधारकांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट ठेवावे .
बालविवाह रोखण्यासाठी पोलीस विभागाने विशेष लक्ष द्यावे. अपहरण झालेल्या किंवा घरातून निघून गेलेल्या मुलींच्या शोधासाठी आणि परत आलेल्या मुलींचे समुपदेशन करण्यासाठी भरोसा सेलच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करावे. पोलीसांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, दक्षता समितीच्या बैठका नियमित घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी पोलीस विभागाला दिल्या.
कोविड कालावधीत कामगार, बांधकाम मजूर, रिक्षा चालक यांना मदत देण्यासाठी संबंधित विभागांनी योजनांची अंमलबजावणी करावी. याबाबत डाटाबेस तयार करावा. ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामांची सुरुवात करावी. या योजनेतून पाणंद रस्ते रुंदीकरण यासारखी कामे हाती घ्यावीत, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
महिला बचतगटांना मदत होईल, अशा पध्दतीने काम करावे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी महिला बचतगटांच्या माध्यमातून जाणीव जागृती करावी, अशी सूचनाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांचे विशेष अभिनंदन
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कोविड सेंटरमधील महिला रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी राबविलेल्या उपक्रमांचे विशेष अभिनंदन केले. डॉ. देशमुख यांनी कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिला रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी विशेष महिला पोलीस पथक नियुक्त केले होते. या पथकाने जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरना भेट देऊन महिला रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न केले होते. याचा चांगला उपयोग झाला होता.
बैठकीस पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, जालना जिल्हाधिकारी विजय राठोड, जळगाव जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जळगाव महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, पुणे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, धुळे निवासी उपजिल्हाधिकारी संजय राठोड, पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली.