पुणे-रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊनतर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येणारा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार (वेरा २०१७-१८) यंदा बीव्हीजी इंडियाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर हणमंतराव गायकवाड यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते रविवार, दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता नारायण पेठेतील केसरी वाडयात असलेल्या लोकमान्य सभागृहात होणार आहे.
व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. कार्यक्रमाला क्लबच्या डायरेक्टर डॉ. शुभदा जठार, सेक्रेटरी विजय बोधनकर, प्रेसिडंट अभिजीत म्हसकर आदी उपस्थित राहणार आहेत.
हणमंतराव गायकवाड हे सोशल आंत्रप्रुनिअर, मोटीव्हेशनल स्पीकर, इंडस्ट्री पायोनियर म्हणून ओळखले जाते. त्यांनी कंपनीमध्ये काम करीत असताना आठ जणांना सोबत घेऊन हाऊसकिपींगची कामे करण्यास सुरुवात केली. आजमितीस विविध राज्यांमध्ये, शहरांमध्ये ७० हजारांहून अधिक लोकांना त्यांनी उपजिविकेचे साधन उपलब्ध करून दिले आहे. त्यांनी केलेल्या व्यवसाय क्षेत्रातील या कार्यामुळे देशातील तरुणांसमोर ते आदर्श ठरले आहेत. त्यामुळे त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊनतर्फे आत्तापर्यंत सुलोचना चव्हाण, प्रशांत दामले, सुबोध भावे, श्रीधर फडके, स्वाती काटकर, प्रमोद त्रिपाठी, अंजली धारु, अमर ओक, सुनिल मेहता, डॉ. निलेश साबळे, जयश्री तोडकर, कविता बोंगाळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.