पुण्यात आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास महिलांना मोफत बस सेवा देणार असे सांगत आज आप ने बस डे म्हणजे मनपा निवडणुकीच्या तोंडावर केलेला केवळ एक दिवसाचा देखावा आहे अशी टीका केली आहे .
पुण्यात आज बस डे आहे. या बस डे च्या निमित्ताने समाजाच्या विविध घटकांना कमी खर्चात बस प्रवास देण्याची योजना पीएमपीएलनी आखली आहे. एक दिवस बस जादा संखेने सोडून आणि कमी खर्चाचे तिकीट घेऊन पीएमपीएल बस सेवा सुधारेल, पुणेकरांना पीएमपीएल बस वाहतुकीचे महत्त्व कळेल आणि मोठ्या संख्येने प्रवासी वाढतील असा युक्तिवाद केला जात आहे. सार्वजनिक बस वाहतूक सेवेचे महत्व पुणेकरांना पटवून देण्याची गरज नाही… ते त्यांना पटलेलेच आहे. मुद्दा पीएमपीएलने चांगली, दर्जेदार, नियमित, पुरेशी, किफायतशीर, सुरक्षित अशी बस वाहतूक सेवा देण्याचा आहे. अशी बस सेवा देण्यामध्ये पीएमपीएल अपयशी ठरत आहे आणि पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या आधी एक दिवसाचा बस डे चा देखावा हे त्याच्यावरचं उत्तर नाही. पीएमपीएलचे काम हे महत्व पटवून देण्याचे नसून सामान्य प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सार्वजनिक बस वाहतूक सेवा कशी उपलब्ध करून देता येईल याचे प्रयत्न करणे हे आहे. त्यासाठी योग्य नियोजन करणे आणि केलेल्या नियोजनाचे चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करणे हे आहे असे मत आपच्या पीएमपीएल टीमचे प्रमुख समन्वयक सेंथील अय्यर यांनी मांडले.
पीएमपीएलच्या कामकाजामध्ये आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. या परिवहन महामंडळाच्या कामकाजातील अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, ठेकेदारांशी व प्रस्थापित नेत्यांशी असलेले हितसंबंध मोडीत काढून प्रवासी केंद्री बस वाहतूक सेवा देणे गरजेचे आहे. आम आदमी पक्षाने ज्या पद्धतीने दिल्ली मध्ये महिलांना मोफत बस सेवा दिलेली आहे आणि तरीदेखील ती तेथील परिवहन सेवा ही फायद्यामध्ये आहे. पुण्यात देखील वाढते प्रदूषण, दुचाकींची प्रचंड संख्या आणि त्याचा सर्वसामान्य पुणेकरांच्या आरोग्यावर, आयुष्यावर होणारा परिणाम लक्षात घेता महिलांना मोफत बस सेवा मिळाली पाहिजे ही आम आदमी पक्षाची भूमिका आहे. केवळ एक दिवस मोजक्या रूटवर मोजक्या बसेसमध्ये मोफत बस सेवा देऊन आणि काही लोकांना बक्षिसे देऊन हा प्रश्न सुटणारा नाही. पी एम पी एल ची स्पर्धा ही दुचाकीच्या किफायतशीर गणिताशी आहे. हे लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही नेहमी महिला, अपंग, वृद्ध यांच्यासाठी मोफत असायला हवी. बस वाहतूक सेवेमध्ये अमुलाग्र सुधारणा होणे गरजेचे आहे.
आज या बस डेचेच निमित्त साधून आम आदमी पक्षाच्या पी.एम.पी. एल. टीमने एक सर्वेक्षण सुरु केलेले आहे. याद्वारे पी.एम.पी. एल.ने प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षाद्वारे केला जात आहे आणि त्यातून निघालेले तथ्य, त्यातून निघालेल्या ज्या बाबी आहेत त्या पी.एम.पी. एल. जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आम आदमी पक्षाद्वारे पोचवण्यात येणार आहेत.

