कॅनडात भीमजयंती समता दिन म्हणून साजरी करण्याच्या ब्रिटिश कोलंबियाच्या निर्णयाचे स्वागत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि. 12 – भारतीय राज्य घटने चे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वर्ल्ड साइन ऑफ ईक्वालिटी समतेचे जागतिक प्रतीक म्हणून कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया तर्फे जाहीर करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल जयंतीदिन समता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गौरवास्पद असून भीमजयंती जागतिक स्तरावर समतादिन म्हणून साजरी करण्याच्या कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया या राज्याचा निर्णय स्वागतार्ह आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
क्रांतिसूर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे सार समता या तत्वात आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात उभारलेला अस्पृश्यता निर्मूलनाचा लढा; मानवमुक्तीचा लढा ठरला. हा लढा जागतिक स्तरावर मानव अधिकाराचा समतेचा लढा म्हणून प्रेरणादायी ठरला आहे.त्यामुळे संपूर्ण जगात दि.14 एप्रिल ला भीमजयंती ही समता दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.त्याबद्दल कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया राज्य सरकार चे आम्ही त्यांना पत्र पाठवून अभिनंदन करीत आहोत असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले.

