श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने ‘तुळशीबाग स्री शक्ती सन्मान’
पुणे : सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. महिलांचे कर्तृत्व पुढे आणण्यात समाज अनेकदा कमी पडला. त्यांचे कार्य समोर आणणे हे देखील एक प्रकारे इतिहास घडविण्यासारखे आहे. समाजातील यशस्वी महिलांच्या मागे अनेकदा महिलाच असतात, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गो-हे यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने ‘तुळशीबाग स्री शक्ती सन्मान’ सोहळ्याचे आयोजन तुळशीबागेतील उत्सवमंडपात करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडीत, डाॅ. शैलेश गुजर यावेळी उपस्थित होते.
अनुराधा के. एच. संचेती, वैशाली रघुनाथ माशेलकर, डॉ. विद्या राजीव येरवडेकर (मुजुमदार), शैला दातार, डॉ. संजीवनी अविनाश ईनामदार, डॉ. स्वाती धनंजय दैठणकर, गौतमी देशपांडे यांना नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
निलम गोऱ्हे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा पाया दिला म्हणून आज आपण महिला आपल्या पायावर सक्षमपणे उभ्या आहोत. अनेकदा महिलांना शिक्षणाची संधी, सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे तुळशीबाग गणपती सारख्या मंडळांनी आणि नागरिकांनी मिळून स्त्री शक्ती कायद्याचं मंडळ स्थापन करावं या कायद्यासाठी राष्ट्रपतींना निवेदन आपण देऊ. स्त्री शक्ती कायदा हे न्यायाकडे नेणारे आयुध आहे, असेही त्यांनी सांगितले.
नितीन पंडीत म्हणाले, तुळशीबाग आणि महिला हे एक अतुट नातं आहे. तुळशीबाग बाजारपेठ ही महिलांचे माहेरघर म्हणून ओळखली जाते. त्यामुळे गणेशोत्सवात एक दिवस महिलांचा हा उपक्रम आयोजित केला जातो. या पार्श्वभूमीवर समाजातील विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शैलेश गुजर यांनी पुरस्कारार्थीसोबत संवाद साधला. विनायक कदम यांनी आभार मानले.