- श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन
पुणे : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हा उत्सव होणार असून त्यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल यांनी दिली.
राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुजाचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्याजी महाराज यांच्या आशिर्वादाने आणि उपस्थितीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. धार्मिक कार्यक्रमामध्ये होम-हवन, महाअभिषेक, सुवर्ण कमल अर्चना, पालखी सोहळा व फुलांची होळी तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये उत्सव मूर्तीची धान्यतुला करुन ते धान्य गरजूंना वाटप अशा उपक्रमांचा समावेश आहे.
राजकुमार अग्रवाल म्हणाले, शनिवार, दिनांक १२ फेब्रुवारी रोजी गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापना होणार आहे. शनिवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता १०८ कलश अभिषेक होणार असून रात्री ८ वाजता श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू भगवान यांच्या उत्सवमूर्तीची धान्यतुला होणार आहे. तसेच रात्री ८.३० वाजता सुवर्ण कमल अर्चना व रजत कमल अर्चना होईल.
रविवार, दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता केशर दूध अभिषेक, रात्री ८ वाजता मंदिरात पालखी सोहळा आणि रात्री ८.३० वाजता पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी होणार असून ब्रह्मोत्सवाची सांगता होईल. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून पुणेकरांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.