पुणे : दसरा, दिवाळी हे सण जवळ येत आहेत, या सणांच्या पार्श्वभूमीवर भारतात चिनी वस्तू स्वस्तात विकून भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचा चीनचा कुटील डाव आहे. चीनचा हा कुटील डाव उधळून लावून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळ द्या, असे आवाहन भाजप चिटणीस सुनील माने यांनी आज व्यापारी महासंघाला केले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांना त्याबाबतचे पत्र दिले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा पुणे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास उपस्थित होते.सुनील माने म्हणाले, लोकसंख्येचा विचार करता जगात भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच व्यापाराच्या दृष्टीने भारत ही एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भारतात लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात.याचाच फायदा घेऊन चीन आपल्या वस्तूंची भारतात स्वस्तात विक्री करते. तुलनेने चायनीज वस्तू स्वस्त असल्याने ग्राहकांचा या वस्तू खरेदी करण्यावर भर असतो. मात्र अशा वस्तू स्वस्तात विकून चीनचा भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचा कुटील डाव आहे. सातत्याने भारताविरुद्ध भूमिका घेऊन चीन भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करते, सीमेवर चीन वारंवार भारतीय सैन्याच्या कुरापती काढत आहे. त्याला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे. मात्र चीन मधून येणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार घालून आपण ही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ‘ आत्मनिर्भर भारत’ हा नारा दिला आहे. याप्रमाणे आपण भारतीय बनावटीच्या वस्तू विकण्यास प्राधान्य दिल्यास, देशातील पैसा देशातच राहील. या पैशाचा वापर आपल्याला देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी होईल. म्हणूनच मोदीजींच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी आपण चिनी बनावटीच्या वस्तू विकण्यावर बहिष्कार घातला पाहिजे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत. देशहितासाठी चिनी वस्तूंची कमीत कमी विक्री करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
दसरा, दिवाळीत चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला ;भाजप चिटणीस सुनील माने यांचे व्यापारी महासंघाला आवाहन
Date:

