पुणे -बांधकामासाठी सिमेंटचा पुरवठा केल्यानंतर त्याचे ३६ लाख रुपयांचे बिल मागणाऱ्या व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत पैसे देण्यास नकार दिला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात निर्मिती डेव्हलपर चे पंढरीनाथ सुभाष म्हस्के व संतोष सुभाष म्हस्के (दोघेही रा. नऱ्हे) या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी प्रकाश शिवनारायण भुतडा (वय ४२, रा. प्राईड कुमार सिनेट, सेनापती बापट रस्ता) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० जुलै २०१७ ते ३० मे २०१८ कालावधीत घडला होता. पंढरीनाथ म्हस्के व संतोष म्हस्के यांची निर्मिती डेव्हलपर्स नावाची बांधकाम व्यावसायिक कंपनी आहे. तर फिर्यादी हे बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंटचा पुरवठा करतात. संबंधित कंपनीने फिर्यादीकडे सिमेंटची मागणी केली होती. त्यानुसार, फिर्यादींनी सिमेंट दिले, मात्र, त्यांनी सिमेंटचे झालेले ३६ लाख ४७ हजार ८०५ रुपयांचे बिल दिले फिर्यादीस दिले नाही. रक्कम मोठी असल्याने फिर्यादी हे त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी संतोष मस्के यांनी फिर्यादीना पिस्तूल दाखवीत ‘तू जर परत पैसे मागण्यासाठी आला तर तुला ठोकून टाकीन,’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर फिर्यादींनी या प्रकरणामध्ये न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरणामध्ये न्यायालयाने १५६ (३) कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुन्हा दाखल केला आहे, असेवरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी सांगितले

