पुणे, ता. २९ : मुळा नदीतील वाढलेल्या जलपर्णी मुळे औंध रोड, बोपोडी येथील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी या जलपर्णी काढण्या बाबत आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात अधिकाऱ्यांना नदीपत्रातील वाढलेल्या जलपर्णी तसेच येथील गणेश विसर्जन घाटाची झालेली दुरावस्ता दाखवली असून, लवकरच नदीपत्रातील जलपर्णी काढण्याचे तसेच सुशोभीकरणाचे काम सुरू होईल असे पीएमपीमएलचे संचालक प्रकाश ढोरे यांनी सांगितले.
पीएमपीमएलचे संचालक प्रकाश ढोरे, भाजप चिटणीस सुनील माने यांच्यासोबत औंध – बोपोडी क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त संदीप खलाटे यांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. औंध – बोपोडी क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता संजय अधिवंत, कनिष्ट अभियंता अमोल गोल्हार यांच्यासह बोपोडी येथील सामाजिक कार्यकर्ते करवस बघाळे, राधाकृष्ण कुरूप आदींच्या उपस्थितीत हा पाहणी दौरा पार पडला.
यावेळी बोलताना प्रकाश ढोरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून औंध रोड, बोपोडी भागात अनेक विकासकामे सुरू आहेत. या भागातील नगरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुळा नदीत वाढलेल्या जलपर्णीमुळे येथील लोकांना मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी तसेच डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे साथीचे आजार होऊन लोकांना गंभीर स्वरुपाचे आजार होण्याची शक्यता आहे. येथे असलेल्या शाहू महराज पक्षी केंद्रामध्ये सकाळी व संध्याकाळी लोक व्यायामासाठी तसेच फिरण्यासाठी येतात. या नदीकिनाऱ्या लगत अनेक सोसायट्या आहेत. येथील सोसीयटी मधील लोकांना ही मोठ्या प्रमाणावर या वाढलेल्या जलपर्णी मुळे त्रास सहन करावा लागतो. या जलपर्णी काढणे आवश्यक आहे. म्हणूनच आज औंध क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त संदीप खलाटे व अन्य अधिकाऱ्यांच्या सोबत हा पाहणी दौरा आयोजित केला होता. यापूर्वीही वाढलेल्या जलपर्णी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून काढून घेतल्या होत्या. मात्र आता पुन्हा नदीपात्रात जलपर्णी वाढत आहेत.
येथे असणाऱ्या गणेश विसर्जन घाटाची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. त्यामुळे गणेश विसर्जन काळात गणेश भक्तांची मोठी गैरसोय होते. या तुटलेल्या घाटामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घाटाची वेळीच दुरुस्ती होणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ही कामे रखडली होती. आता या कामांना गती देणार असल्याचेही ढोरे यांनी यावेळी सांगितले.

