पुणे : रक्तदाब, मधुमेह आदी जुनाट व्याधींनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्ष वयावरील लोकांनाही कोविड प्रतिबंधक लसचा बूस्टर डोस द्यावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी पत्राद्वारे केली आहे.
सध्या ६० वर्ष वयावरील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसचा तिसरा डोस- बूस्टर डोस दिला जात आहे. जुनाट व्याधींनी ग्रस्त असलेल्या लोकांनाही त्यांच्यात कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण होण्याकरिता तिसरा डोस देण्याची गरज आहे, वैद्यकीय तज्ज्ञांच्या अहवालातही ही बाब नमूद करण्यात आली आहे. जुनाट व्याधीग्रस्तांना साथीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जास्त तडाखा बसला आहे. हे प्रमाण ५२ टक्के आहे. सरकारने यातील गांभीर्य लक्षात घेऊन तिसऱ्या डोससाठी ४५ वर्ष वयावरील जुनाट व्याधीग्रस्तांना समाविष्ट करावे, असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.


