पुण्यातील सहेली संघ व मैत्र युवा फाऊंडेशनतर्फे वेश्यावस्तीतील (देहविक्रिय) महिलांसाठी ‘विचारांची पुस्तकपेटी’ उपक्रमाच्या दुस-या टप्प्याला प्रारंभ
पुणे : जगणे म्हणजे आशेच्या किरणांचा आवाका गवसणे. अंधा-या कपा-यांमध्ये ज्याठिकाणी सूर्याची किरणे पोहचू शकत नाही, तेथे ज्ञानाची किरणे पोहोचतात. ही ज्ञानाची किरणे पोहोचविण्याचे काम पुस्तके करतात. त्यामुळे या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच अंधारलेल्या जगात उजेडाकडे नेण्याचे काम पुस्तके नावाडी म्हणून करतील. त्यातूनच त्यांचे मनपरिवर्तन होईल, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
बुधवार पेठेत काम करणा-या सहेली संघ ही संस्था आणि मैत्र युवा फाऊंडेशनतर्फे वेश्यावस्तीतील (देहविक्री करणा-या महिला) महिलांसाठी विचारांची पुस्तकपेटी या सुरु असलेल्या उपक्रमाच्या दुस-या टप्प्याची सुरुवात सहेली संघात झालेल्या कार्यक्रमात झाली. यावेळी सहेली संघच्या कार्यकारी संचालिका तेजस्वी सेवेकरी, मैत्र युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, सहेली संघच्या अध्यक्षा महादेवी मदार, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादव आदी उपस्थित होते. यावेळी या पुस्तकांचे व पेटीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
डॉ.रामचंद्र देखणे म्हणाले, जाणीवा शोधल्याशिवाय माणसाला माणूस गवसत नाही. या महिलांचे विश्व अंधाराने कोंडलेले आहे. अंधारलेल्या जगाला उजेडाकडे नेण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तके या केवळ जाणीवा नाहीत, तर जगण्याची दिशा देतात. त्यामुळे पुस्तक पेटीचा उपक्रम महिलांच्या आयुष्याचा विचारांच्या प्रकाशाचा किरणोत्सव घेऊन येईल.
तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, देहविक्रीच्या व्यवसायात महिलांनी येण्याची शारिरीक हिंसा, शिक्षणाचा अभाव, गरीबी अशी अनेक कारणे आहेत. अनेक महिलांना यापासून परावृत्त करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न अनेक सामाजिक संस्था करतात. मात्र, त्यांचा मानसिक विकास व्हावा, त्यांचे विचार परिवर्तन व्हावे, याउद््देशाने हा उपक्रम घेतला आहे. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये आजमितीस १ हजार ५०० हून अधिक महिला आहेत. त्यामध्ये मराठी, हिंदीसह बंगाली, तमीळ आदी भाषा बोलणा-या व वाचू शकणा-या महिलांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेतील पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
संकेत देशपांडे म्हणाले,पुस्तकांनी भरलेली पुस्तकपेटी वस्तीतून फिरविण्यात येणार आहे. महिलांनी या पेटीतून आवडतील अशी पुस्तके घेऊन वाचावी, हा यामागील उद््देश आहे. मैत्र युवा फाऊंडेशनचे युवा कार्यकर्ते पुस्तक पेटी घेऊन वस्तीत जाणार असून काही महिलांना पुस्तके वाचून देखील दाखविणार आहेत. महिलांच्या आरोग्याशी निगडीत पुस्तके, चरित्रे, मासिके, विनोदी किस्से, मनोरंजनपर पुस्तकांचा समावेश देखील पेटीमध्ये आहे.
* संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे यांनी पुस्तक पेटीकरीता दिली २१ पुस्तके
विचारांची पुस्तकपेटी या उपक्रमाकरीता संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे यांनी २१ पुस्तके दिली आहेत. यामध्ये कथासंग्रह, आत्मचरित्र अशा प्रकारांचा समावेश आहे. याशिवाय अनेक साहित्यिक व नामवंत देखील याकरीता हातभार लावत आहेत. सामान्य पुणेकरांनी , साहित्यिकांनी, प्रकाशकांनी देखील पुस्तके देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे. त्याकरीता तेजस्वी सेवेकरी मो. ९८८१४०४८११, संकेत देशपांडे मो. ९८५०५०२७२९ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजसमोर असलेल्या सहेलीच्या कार्यालयात पुस्तके आणून द्यावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

