पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या दहा हजारहून अधिक कामगारांना अखेरआज ऐन दिवाळीत बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.आणि तो त्यांच्या खात्यावर जमाही झाला अशी माहिती आज स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली . पीएमपीला देण्यात येणाऱ्या संचलन तुटीतील तरतुदीतून उचल देण्याचा निर्णय आज महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला. त्यामुळे येत्या दोन दिवसात ‘पीएमपी’च्या १० हजार कामगारांना प्रत्येकी १७ हजार रूपये बोनस मिळणार आहे असे म्हणत असतानाच आज संध्याकाळी रासने यांनी सांगितले कि आज घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमबजावणी झाली असून पीएमपीएमएलच्या 10 हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम आजच्या आज जमा करण्यात आली आहे यामुळे त्यांची दिवाळी गोड होण्याचा मार्ग आयत्यावेळी का होईना सुकर झाला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) दहा हजारहून अधिक कर्मचार्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) देता यावा यासाठी पीएमपीएमएलला महापालिकेने द्यायच्या संचलन तुटीतून उचल देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, पीएमपीएमएलकडून कर्मचार्यांना बोनस देता यावा यासाठी पुणे महापालिकेच्या हिश्याचे २४ कोटी ३१ लाख रुपये द्यावेत अशी मागणी करर्णयात आलेली आहे. पुणे महापालिकेकडून पीएमपीएमएलला मोफत किंवा सवलतीच्या दराचे बसपास, इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे बसपास यासाठी संचलन तुट रक्कम दिली जाते. मात्र सानुग्रह अनुदान किंवा बक्षीस वाटपासाठी रक्कम दिली जात नाही.रासने पुढे म्हणाले, गेल्या आर्थिक वर्षात पीएमपीएमएलकडून वितरीत करण्यात आलेल्या मोफत किंवा सवलतीच्या दरातील पासेसची रक्कम तीन कोटी आठ लाख रुपये इतकी आहे. या संदर्भात आयुक्तांनी पाठविलेल्या अभिप्रायाचे अवलोकन करून बोनस देण्यासाठी आवश्यक असणारी एकवीस कोटी रुपयांची उचल देण्यास मान्यता देण्यात आली. ही रक्कम सेन २०२१-२२ च्या संचलन तुटीच्या तरतुदीमधून समायोजित करण्यात येणार आहे.
१० वर्षे रक्तपेढी संचलनाचे पूना मेडिकल रीलिफ अण्ड रीसर्च फाउंडेशनकडे
पुणे महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात उभारण्यात येणार्या रक्तपेढीच्या संचलनासाठी पूना मेडिकल रीलिफ अण्ड रीसर्च फाउंडेशन या संस्थेबरोबर करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयाच्या दुसर्या मजल्यावरील बावीसशे चौरस फूट जागेवर रक्तपेढीची निर्मिती करण्यात येत आहे. पुणे महापालिका आणि पूना मेडिकल रीलिफ अण्ड रीसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहा वर्षांच्या मुदतीसाठी हा प्रकल्प चालविण्यात येणार आहे. या संस्थेकडून जागेचे भाडे घेण्यात येणार नाही. पाणी आणि वीजपुरवठ्याचा खर्च महापालिका करणार आहे. रक्तपेढी २४ तास सुरू ठेवणे आणि त्यासाठी आवश्यक असणारे तज्ज्ञ आणि कुशल मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहणार आहे.
रासने पुढे म्हणाले, जगात प्रत्येक दिवशी विविध प्रकारच्या उपचारांसाठी ४० हजार युनिट रक्ताची गरज लागते. कृत्रिम पद्धतीने रक्ताची निर्मिती करता येत नसल्याने रक्त संकलन आणि रक्तसाठा करण्यासाठी रक्तपेढ्या महत्त्वाच्या ठरतात. आतापर्यंत महापालिकेची रक्तपेढी नसल्याने इतर रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. महापालिकेच्या पहिल्या स्वतंत्र रक्तपेढीच्या निर्मितीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अत्यल्प दरात मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
पूना मेडिकल रीलिफ अण्ड रीसर्च फाउंडेशनने दिलेले रक्ताच्या विविध चाचण्यांचे दर
संपूर्ण रक्त तपासणी – ७०० रुपये
रेड सेल कॉन्सनट्रेशन – १०५० रुपये
प्लाझ्मा – ३०० रुपये
प्लेटलेट कॉन्सनट्रेशन – ३०० रुपये
अफीअरसिस फॉर एसडीपी – ९४५० रुपये
फॅक्टर VIII फॅक्टर IX आणि क्रायोप्रीपिटेट – प्रत्येकी १०० रुपये
कोविड सेंटरमधील तातडीच्या औषध सेवेसाठी निधी देण्यास मान्यता
पुणे महापालिकेच्या बाणेर येथील डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड हॉस्पिटल येथे तातडीचा औषध पुरवठा करणार्या आर. ए. एस. पी. एल. इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि सीओईपी जम्बो कोविड सेंटर इमर्जन्सी मेडिसिन सर्व्हिसेस या संस्थांसाठी अनुक्रमे दोन आणि तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये गाडीखाना येथील मध्यवर्ती औषध भांडारातून आवश्यकतेनुसार औषध पुरवठा केला जातो. कोविड सेंटरमधून होणार्या औषधांच्या मोठ्या मागणीमुळे औषधांचा पुरवठा करताना मर्यादा येतात. रुग्णांना उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा पुरविणार्या संस्था औषध देण्याबाबत वेळोवेळी निर्णय घेत असतात. त्यामुळे तातडीने द्यावयाची अत्यावश्यक औषधे वेळेवर उपलब्ध करून देताना रुग्णांची गैरसोय होऊ शकते. या बाबींचा विचार करून वरील दोन संस्थांच्या माध्यमातून तातडीचा औषध पुरवठा केला जातो. आतापर्यंत त्यांनी वितरीत केलेल्या औषधांवर झालेल्या खर्चाच्या रकमेइतकी बिले देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
साने गुरुजी नगर वसाहत पुनर्विकास कामासाठी मान्यता
साने गुरुजी नगर (आंबील ओढा) येथील वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, या प्रकल्पासाठी निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीने सादर केलेल्या पूर्वगणन पत्रकापेक्षा ११.११ टक्के कमी दराने आलेल्या निविदेला मान्यता देण्यात आली. प्रकल्पासाठी सुमारे १३ कोटी ४२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, जीएसटीपोटी सुमारे एक कोटी ८१ लाख रुपये आणि रॉयल्टी म्हणून २ लाख ९५ हजार रुपये आणि मटेरियल टेस्टिंग साठी २८ लाख ७३ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
रासने म्हणाले, महापालिका कर्मचार्यांची घरे असणार्या साने गुरुजी नगर पुनर्विकासाचा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या वसाहतीची निर्मिती होऊन पन्नासहून अधिक वर्षे झाली आहेत. या वसाहतीतील काही इमारती धोकादायक झाल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी या वसाहतींच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम पूर्ण करण्यास तीस महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
सर्व शिक्षा अभियानातील कर्मचार्यांना बोनस
पुणे महापालिका शिक्षण विभागातील सर्व शिक्षा अभियानात काम करणार्या ६६ कर्मचार्यांना मनपा सेवकांप्रमाणे बोनस सानुग्रह अनुदान देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी फर्निचर आणि पुस्तक खरेदी
पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी बाबुराव सणस विद्यालयात १ कोटी ९७ लाख रुपयांचे फर्निचर आणि ६२ लाख ५१ हजार रुपयांच्या पुस्तकांची खरेदी करण्यात स्थायी समितीने मान्यता दिली.

