पुणे दि.२९: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चाकण औद्योगिक क्षेत्राच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल 819 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.
टाटा मोटर्स समूहातील 561 व फोक्सवॅगन समूहातील 258 हून अधिक रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले आहे. टाटा मोटर्सच्यावतीने समूहाच्या आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सकाळपासून रक्तदान करण्यासाठी अनेकांनी नावनोंदणी केली. यामध्ये तब्बल 561 बॅग रक्त संकलन करण्यात आले. फोक्सवॅगन समूहातील 258 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
ससून रुग्णालयाकडून अरूण बर्डे तसेच ससून रुग्णालयाच्या ब्लड बँक टिमने रक्तसंकलन केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाचे भूमापक तुषार तांबे व बालाजी माने यांनी संयोजन केले.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिराचा अत्यंत चांगला उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

