धगधगती मशाल गद्दारांच्या बुडाखाली आग लावणार: खोकेवाले दफन होतील… सामनातून बंडखोरांवर टीकेची तोफ

Date:

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नवे नाव आणि ‘धगधगती मशाल’ ही नवी निशाणी दिल्यानंतर ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी शेकडो शिवसैनिक धगधगती मशाल हाती घेऊन रस्त्यावर उतरले. ही मशाल गद्दारांच्या बुडाखाली आग लावेल व खोकेवाले दफन होतील, असा जळजळीत इशारा शिवसेनेने दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून बंडखोरांवर टीकेची तोफ डागण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवट्यामागे भ्रष्ट, बेइमान गेंड्याची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता पेटविल्या की गेंडयाची कातडीही जळून जाईल. छे छे! यांना जाळायचे कसे? ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे, ‘येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे!’ त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील! हे राज्य शिवरायांचे आहे. शिवसेना शिवरायांचा अंश आहे. तो अंश तुम्ही कसा मिटवणार?

शिंदे गटाचे प्रवक्ते बाजारबुणगे

शिवसेनेने म्हटले आहे की, मिंधे-फडणवीस युगात असत्यालाही वाचा फुटू लागली आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी केली. या अन्यायाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राचे मन पेटून उठले असताना मिंधे गटाचे प्रवक्ते व राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे सत्य व न्यायाचा विजय असल्याचे म्हटले आहे. जगात न्याय आहे असे केसरकरांसारख्या बाजारबुणग्यास वाटणे साहजिकच आहे. कारण हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही. अनेक पक्षांत फिरून हे महाशय शिवसेनेत आले व मंत्रीपदाचे गाजर दिसताच मिंधे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेवर दिल्लीचा आघात म्हणजे महाराष्ट्राचा घात हा स्वाभिमानी विचार त्यांच्या मनालाही शिवणार नाही.

भाजप व त्यांचे सूत्रधार नामर्द

शिवसेनेने टीका केली की, भारतीय जनता पक्ष व त्यांचे सध्याचे सूत्रधार हे नामर्द आहेत. म्हणून त्यांनी थेट लढण्याऐवजी शिवसेनेचे अस्तित्व कागदोपत्री संपविण्याचा दळभद्री प्रकार केला. त्यांना मुंबईवर ताबा मिळवायचा आहे. मुंबईचे काय घेऊन बसलात? आधी पाकव्याप्त कश्मीरचा ताबा घेऊन वीर सावरकरांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करा. तुम्हाला शिवसेनेचा पराभव करता येणार नाही. समोरासमोर लढण्याची त्यांची हिंमत झालीच नाही. त्यांनी मिंधे गटाच्या बृहन्नडांना, शिखंडींना पुढे करून शिवसेनेच्या पाठीत बाण खुपसला. याआधी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरे यांनीही त्यांचा मार्ग स्वीकारला. पण, ज्या शिवसेनेचा जन्म प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादातून झाला, ज्या प्रबोधनकारांनी मराठी माणसांच्या संघटनेस ‘शिवसेना’ हे ज्वलंत नाव दिले व ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्र सेवेसाठी अर्पण केले, त्या शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य जसे एकनाथ शिंदे या गारद्याने केले, तसे या मंडळींनी केले नाही.

निवडणूक आयोगाचा बाप कोण?

शिवसेनेने म्हटले आहे की, गद्दारांचा राजकीय निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही.केंद्रीय संस्था आणि यंत्रणा दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच्या गुलाम बनल्या आहेत. शिवसेनेचे म्हणणे सोपे आणि कायद्याला धरून होते. अंधेरीला विधानसभेची पोटनिवडणूक आहे. त्या निवडणुकीत भाजपचे ‘रडके’ मिंधे गट निवडणूक लढविणार नाहीत. त्यामुळे निवडणूक चिन्हाबाबत इतक्या घाईने निर्णय घेण्याची गरज नाही. अंधेरी निवडणूक शिवसेनेस धनुष्यबाण चिन्हावर लढू द्या, ही सरळ मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावलीच, पण ‘शिवसेना’ हे नावदेखील वापरू नका, असा बंदीहुकूम लादला. निवडणूक आयोगाच्या राजकीय बापांना वाटत असेल, या अरेरावीमुळे शिवसेनेचा पराभव करता येईल. शिवसेना खचून जाईल. पण, शिवसेना स्वाभिमानाच्या मजबूत पायावर ती 56 वर्षांपासून न डगमगता उभी आहे. अनेक वादळे आणि घाव झेलून तिने झंझावात कायम ठेवला आहे. शिवसेना संपवू अशी स्वप्ने पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचून शिवसेनेने अनेक अग्निपरीक्षा पार केल्या आहेत.

खोकेबाज मिंध्यांवर लोक थुंकतात

शिवसेनेने म्हटले आहे की, ज्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार आहे. गद्दारांना इतिहासात कधीच स्थान नसते. पोवाडे मर्दांचे व स्वाभिमान्यांचे गायले जातात. खोकेबाज मिंध्यांवर लोक थुंकतात. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या बाबतीत त्यांची नीच खेळी केली. आता पुढे काय? सत्तेचा गैरवापर, पैशांचा मस्तवाल वापर करून तुम्ही जे केलेत ते शेवटचे टोक. त्या टोकावर आज शिवसेना आहे व भरारी घेण्यासाठी संपूर्ण आकाश मोकळे आहे. जणू शिवसेनेचा पुनर्जन्मच होताना आम्ही पाहत आहोत.

शिवसेना शिवरायांचा अंश

ठाकरे गटाने म्हटले आहे की, चारशे वर्षांपूर्वी शिवरायांचा जन्म हा ईश्वरी अंश होता. त्या जन्माने महाराष्ट्राच्या दऱ्या, खोऱ्या, नद्या आनंदून गेल्या. जुलमी मोगलांविरुद्ध लढण्याचे नवे बळ मिळाले. मऱ्हाठा एकवटला. भवानी तलवार मोगलांविरुद्ध तुटून पडली. त्या तलवारीने महाराष्ट्र दुश्मन व अनेक गारदी याच जमिनीत गाडले गेले. आज महाराष्ट्र पुन्हा त्याच वळणावर, त्याच परिस्थितीत उभा आहे. या परिस्थितीला शरण जाणार नाही, असे महाराष्ट्र दिल्लीकडे बघून गर्जत आहे. शिवसेनेचा आत्मा तोच राहील. रंगरूप तेच राहील. वस्त्र बदलेल. आत्मा कसा बदलेल? शिवसेना शिवरायांचा अंश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...