- प्रभागातील झावळ्या व पाला पाचोळ्याचे खतात रूपांतर करण्यासाठी श्रेडिंग मशीन – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.
पुणे- आपल्या भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी चे लोकप्रतिनिधी काम करत असतात त्यामुळे त्यांना मोठया प्रमाणात नागरिकांची साथ मिळते व त्यातून प्रभागाचा विकास अधिक नियोजनबद्ध पद्धतीने केला जातो असे भाजप चे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले.भाजप ने गत चार वर्षात शहर विकासाचे अनेक प्रकल्प राबविले असून त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुणेकर पुन्हा भाजप ला पसंती देतील असा विश्वास ही जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला. झावळ्या व पाला पाचोळ्यापासून होणाऱ्या खताचा वापर व्हावा यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित व शिक्षित केले पाहिजे जेणेकरून येणारे पीक हे शरीरासाठी उपयुक्त असेच येईल व नागरिकांवर केमिकल व अन्य औषधी फवारलेल्या पिकांमुळे होणारे दुष्परिणाम देखील टळतील असेही मुळीक म्हणाले.
शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या विकासनिधीतून बसविण्यात आलेल्या श्रेडर च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी आपल्या प्रस्ताविकात श्रेडिंग मशीन मागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की प्रभाग 13 हा हरित प्रभाग असून येथील सोसायट्या व बंगल्यामध्ये मोठया प्रमाणावर नारळ, अंबा इ झाडें आहेत. ह्या प्रभागात झावळ्या व पालापाचोळ्याचा कचरा मोठया प्रमाणावर साचतो व त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न निर्माण होतो.नागरिकांनी रस्त्यावर झावळ्या वा पालापाचोळा टाकला की त्यावर इतर नागरिक कचरा टाकत जातात व त्यातून परिसरात घाण वाढते.ही समस्या सोडविण्यासाठी मी गत दीड वर्षे प्रयत्नशील होते व ह्या प्रकल्पसाठी जागा उपलब्ध होतं नव्हती, अखेर म्हात्रे पुलाजवळ जागा उपलब्ध होऊन आत्ता हा प्रकल्प कार्यान्वित होतं आहे. येथे रोज दोन टन झावळ्या व पालापाचोळ्याचा भुसा तयार होईल व त्याचे शेतात व विविध सोसायटयांमध्ये वापर करता येईल असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. तसेच ह्याचे केक किंवा ठोकळे बनवून त्यांचा स्मशानभूमीत वापर करता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रभागातील नागरिकांची एक मोठी समस्या ह्या माध्यमातून मार्गी लावता आली याचे समाधान वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी नगरसेवक व भाजप सरचिटणीस दीपक पोटे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, जयंत भावे,शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर,वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्य्क आयुक्त संतोष वारुळे,शहर चिटणीस प्रशांत हरसूले, कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधा एडके, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे,सरचिटणीस केतकी कुलकर्णी,उपाध्यक्ष राज तांबोळी, बूथ प्रमुख कुलदीप सावळेकर,प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे, ऍड प्राची बगाटे, गौरीताई करंजकर,जनार्दन क्षीरसागर,मंगलताई शिंदे,रुपालीताई मगर,रामदास गावडे, निलेश घोडके, शेखर जोशी,चंद्रकांत पवार,श्रीकांत गावडे, दीपक पवार,रमाताई डांगे, संगीता शेवडे,व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रेडिंग मशीन चे निर्माते मनोज धारप यांनी प्रात्यक्षिक दाखविले व पूर्ण क्षमतेने रोजच्या रोज झावळ्या व पाळापाचोळ्याची विल्हेवाट लावली जाईल याची ग्वाही दिली.
जगदीश मुळीक यांच्या हस्ते मनोज धारप,अमोल चौधरी,गणेश खिरीड, राहुल शेळके यांना सन्मानित करण्यात आले.
मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक व संयोजन केले, संदीप खर्डेकर यांनी स्वागत, आय टी सेल च्या शहर संयोजिका कल्याणी खर्डेकर यांनी सूत्रसंचालन तर ऍड प्राची बगाटे यांनी आभार प्रदर्शन केले.

