पुणे-राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला लॉकडाऊनच्या काळातील अव्वाच्या सव्वा दराने वीजदर आकारुन बिले पाठवली. आता त्यांना वीजजोडणीच्या नोटिसा पाठवल्या असून, भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज राज्यभर टाळाठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे. कोथरूड मध्येही भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करुन राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात निषेध व्यक्त केला.तसेच, वीज कनेक्शन तोडण्यासाठी महावितरणचे कर्मचारी आले, तर त्यांना मीटरला हात लावू देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.
लॉकडाऊन नंतर महाविकास आघाडी सरकारने अव्वाच्या सव्वा दराने वीजबिले पाठवली. सुरुवातीला ही बिले माफ करणार असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. पण नंतर यू-टर्न घेऊन वीजबिल भरलेच पाहिजे अशी भूमिका घेतली. आता राज्यातील ७५ लाख नागरिकांना वीजजोडणी नोटिस पाठवली आहे. त्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज राज्यभर महावितरणाला टाळाठोको आंदोलन होत आहे.
कोथरुड भाजपा मंडल अध्यक्ष पुनित जोशी यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर टाळेठोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कोणीही वीजतोडणीसाठी आला, तर आम्ही शांत बसणार नाही. एकाही वीजवितरणच्या अधिकाऱ्याला वीज मीटरला हात लावू देणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त केला.
या आंदोलनात भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव वर्षा डहाळे, पुणे शहर भाजपा सचिव अनिता तलाठी, सहकार आघाडी अध्यक्ष सचिन दांगड, कोथरूड मंडलाचे सरचिटणीस विठ्ठल आण्णा बराटे, दिनेश माथवड, गिरीश भेलके, श्रीधर मोहोळ, अनुराधा एडके, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, महिला आघाडीच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष रमेश चव्हाण, पुणे शहर ओबीसी आघाडीचे शंतनू नरके यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
…तरीही ३७ आणि १६ हजार बिल
लॉकडाऊनच्या काळात कोथरूडमधील येदूबा कदम आणि गौरी करंजकर यांचे आठ महिने घर बंद होते. तरीही महावितरणकडून त्यांना ३७ हजार आणि १६ हजारांचे बिल पाठवण्यात आले आहे. त्यामुळे कदम आणि करंजकर यांनी राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

