पुणे- किती पदे हवीत पुण्याचा विकास करायला ? पुणे शहरात भाजपचे आठ आमदार आणि दोन खासदार जनतेने निवडून दिले आहेत. हे सर्व मिळून 10 जण होतात.तरी हि अजून एक महापौर हि पुण्याने भाजपलाच द्यावा म्हणजे पुण्याचा विकास गतीने करता येईल अशी भूमिका खासदार अनिल शिरोळे यांनी घेतली आहे . संसद ,विधानसभा येथे प्रचंड बहुमतातील सत्ता असूनही पुण्याला अच्छे दिन देता न आलेल्या भाजपच्या खासदार अनिल शिरोळे यांनी आता महापालिका देखील भाजपच्या ताब्यात द्या असे जणू साकडेच घातले आहे .
मोदी सरकारच्या दोन वर्षाच्या पूर्तीनिमित्त खासदार अनिल शिरोळे यांनी मागील दोन वर्षाचा आढावा सादर केला. यावेळीत्यांनी हे साकडे घातले . खासदार अनिल शिरोळे म्हणाले की, पुणे शहर झपाट्याने वाढत असून शहर समस्या मुक्त होण्यासाठी नागरिकांनी भाजपचा महापौर द्यावा. यामुळे शहरातील प्रश्न लवकर मार्गी लागतील. तसेच पुणे शहर समस्या मुक्त होण्यास मदत होईल. दोन वर्षाच्या काळात घोरपडी आणि लुल्लानगर उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागण्यात यश मिळाले आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पावर 2010 पासून काम केले जात आहे. त्यावेळेस केंद्रातील आघाडी सरकारला महापालिका आणि राज्य सरकारने पुणे शहराच्या मेट्रोचा अहवाल सादर केला होता. मात्र त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे आक्षेप केंद्र सरकारने घेतले होते. तेव्हाच त्रुटी विरहित अहवाल सादर केला असता. तर 2014 पर्यंत पुण्यात मेट्रो धावली असती. पुण्याच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष आहे. ते अनेक प्रश्नाला गती देत आहे, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.
भविष्यात झोपडपट्टी मुक्त पुणे शहर करण्याचे नियोजन असून शहरातील प्रत्येक घरामध्ये पाईप लाइनद्वारे गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. दोन वर्षाच्या काळातील कामावर समाधान व्यक्त करीत कचरा आणि नदी सुधार या प्रकल्पांना गती दिली जाईल ,असे त्यांनी सांगितले .महापालिकेच्या माध्यमातून बीआरटी प्रकल्प राबविला जात आहे. हा प्रकल्प देखील फसला असून बीआरटी मार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या घटना देखील वाढत आहे, असे ते म्हणाले .

