पुणे- ‘मागील १५ वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन महापालिकेत सत्ता मिळवली. मात्र या दोन्ही पक्षांनी पुण्याचा कोणत्याही प्रकारे विकास केला नाही,’ .शहरात पुष्काळ वेळा घड्याळे फिरली, हात फिरले, आता पुणे महापालिकेत कमळ फुलले पाहिजे, अशा शब्दांमध्ये भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पूनम महाजन यांची निवड झाली. त्याबद्दल युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, युवा मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य सुशांत शुक्ला, जिल्हाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, पुणे शहराध्यक्ष दीपक पोटे यांच्यासह अन्य जिल्ह्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पुणे शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. पुण्यातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली. यासोबतच पीएमआरडीएचा प्रश्नदेखील अवघ्या अडीच वर्षांमध्ये मार्गी लावला,’ असे पूनम महाजन यांनी त्यांच्या भाषणात म्हटले. यावेळी राज्यातील आधीच्या सत्ताधाऱ्यांवर महाजन यांनी शरसंधान साधले. ‘आघाडी सरकारच्या काळात श्रेय घेण्यावरुन कोणतेही प्रश्न मार्गी लावले गेले नाहीत. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी फक्त खोटी आश्वासने देत महापालिकेत सत्ता मिळवली. आता आगामी महापालिकेत कमळच फुलले पाहिजे,’ असे आवाहन यावेळी पूनम महाजन यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.
‘देशात परिवर्तन करण्याचे काम पुणे शहराने केले असून ज्या ज्या वेळेस केंद्रात भाजप ची सत्ता आली, त्यावेळी पुण्यात भाजपचे खासदार होते,’ असेही पूनम महाजन यांनी यावेळी म्हटले. या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘देशातील जनतेने कॉग्रेसला एक हाती सत्ता दिली असतानाही त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रगती केली नाही. आता मोदीच्या हातामध्ये सत्ता असल्याने देश बदलत आहे,’ असे या कार्यक्रमात बापट यांनी म्हटले.