पुणे -सर्जिकल स्ट्राईक नंतर भाजप मध्ये सुरु झालेले इनकमिंग नोटाबंदीमुले थंडावले होते, पण आता नगरपालिकेच्या मतमोजणीचा कौल पाहून भाजपमध्ये अयारामांची आवक उन्हा सुरु झाली आहे.महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी दुपारी काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप आणि घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य अजय दुधाने यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत जवळपास 26 जणांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार बाळा भेगडे आणि पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले हे देखील उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप हे काँग्रेसच्या उमेदवारीवर 2007 ते 12 या काळात नगरसेवक होते. मात्र, त्यापूर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते. तसेच 2012 साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे श्रीकांत जगताप यांनी प्रसन्न जगताप यांचा पराभव केला. दरम्यान प्रसन्न जगताप यांच्या पक्ष प्रवेशामुळे सिहंगड रोड आणि वडगाव धायरी भागात भाजपला ताकद मिळेल काय ? असा प्रश्न आहेच . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य अजय दुधाने हे व्यसनमुक्ती स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम करतात.