पुणे :- इस्राईलचे वाणिज्य राजदूत (कॉन्सुलेट जनरल) डेव्हिड अकाव आणि प्रेस ऑफिसर अनय जोगळेकर यांनी आज पालकमंत्री गिरीश बापट
यांची भेट घेतली. इस्त्राईलच्या प्रगत तंत्रज्ञांनाच्या धर्तीवर आपण पुणे आणि आसपासच्या भागाचा विकास करू शकतो, अशी संकल्पना त्यांनी या भेटी दरम्यान मांडली.
यासाठी सर्व सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. त्याचप्रमाणे पुण्यातील औद्योगिक क्षेत्रात इस्राईल कंपन्यांना सहभागी करून घेण्याबाबतही त्यांनी बापट यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.
यावेळी अकाव यांनी इस्त्राईलमध्ये वापरण्यात येत असलेल्या विविध अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती दिली. ठिबक पद्धत, हायड्रोफोनिक, एअरोफोनिक अशा पद्धती शोधून पाण्याचा ९५ टक्के पुनर्वापर करून पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडविला अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या साह्याने आपल्या भागातील पाण्याचा प्रश्न आपण सोडवू शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
बापट म्हणाले की, अनेक अडथळे पार करून इस्त्राईलने विकासाचे एक मॉडेल जगासमोर मांडले. पाण्याचा पुनर्वापर, बियाणे, अन्नसुरक्षा आणि माती अशा अनेक विषयांत संशोधन करून त्यांनी दर्जा वाढवला. या प्रयोगांमध्ये सातत्य ठेवून त्याचा आपल्या देशात प्रत्यक्ष प्रयोग करून आश्चर्यकारक प्रगती साधली. त्यांच्या या अनुभवाचा फायदा करून घेऊन अशीच प्रकारची प्रगती आपल्याकडेही होऊ शकते.
यावेळी निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल बापट यांचे मनापासून अभिनंदन केले व पालकमंत्री बापट यांना इस्त्राईल भेटीचेही आमंत्रण दिले.