पुणे ता. १८ : अनेक वर्षापासून रेंगाळलेला मेट्रो प्रकल्प मार्गी लावतानाच हिंजवडी ते शिवाजीनगर हा नवीन मेट्रो मार्ग मंजूर केल्याबद्दल हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशनने आज पालकमंत्री गिरीश बापट यांचे आभार मानले. असोसिएशनचे विश्वस्त उमेश भतिजा आणि मुख्य समन्वयक कर्नल शरणजित भोगल यांनी बापट यांची समक्ष भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष योगेश गोगावलेही उपस्थित होते. हा मार्ग मंजूर केल्यामुळे आयटी कर्मचारी खुश झाले असल्याची भावना भतिजा यांनी व्यक्त केली.
यावेळी बापट म्हणाले की, झपाट्याने वाढणारे हिंजवडी येथील आयटी क्षेत्र वाहतूक समस्येच्या विळख्यात अडकले आहे. परंतु यावर तोडगा काढताना पर्यायी रस्ता व रुंदीकरणाबरोबरच येथील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय असावा, असे मला वाटले. या दृष्टीने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. आणि हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग सुरु करण्याचा प्रस्ताव मांडला. जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून कृती आराखडा तयार केला. जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, पिंपरी चिंचवड महापालिका, एमआयडीसी यांच्याशी वारंवार चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय तत्परता दाखवल्याने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, हिंजवडीला जाण्याचा मार्गावर वाहतूक कोंडीची जटील समस्या आहे. हे लक्षात घेऊन आम्ही वाकड उड्डाणपुलाजवळील वाहतूकीची समस्या दूर करण्यासाठी दोन पर्यायी रस्ते उपलब्ध करून देत आहोत. तसेच भूमकर चौक ते लक्ष्मी चौक रस्त्याचे रुंदीकरण व बालेवाडी येथील पर्यायी रस्ता आदी कामेही वेगाने सुरु आहेत. यामुळे एकाच भागात कोंडी होणार नाही. मेट्रो आल्यावर रस्त्यावरील दुचाकी व चारचाकी वाहने कमी होतील, असेही बापट यावेळी म्हणाले.
भतिजा म्हणाले की, पालकमंत्री बापट यांनी हिंजवडी येथील वाहतूक मार्गाचे सर्वेक्षण व सखोल अभ्यास केला आहे. बालेवाडी येथील रस्त्याचे काम त्यांच्याच मार्गदर्शनानुसार सुरु आहे. मेट्रो आणि रिंग रोडच्या रूपाने त्यांनी महत्वपूर्ण कामे मार्गी लावली आहे. येथील वाहतूक प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी बापट यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.