पुणे- शिधापत्रिकेचे डिजिटलायझेशन केल्याने बनावट ग्राहकांना
चाप बसला असून पुणे शहरातील धान्याचा काळाबाजार पूर्णपणे
थांबला आहे. त्यामुळे तब्बल २ हजार टन अधिक धान्य
गोरगरिबांना वाटण्यासाठी उपलब्ध झाले आहे, अशी माहिती
पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
औंध येथील भाजप-आरपीआयचे अधिकृत उमेदवार सुनीता
परशुराम वाडेकर, विजय शेवाळे, अर्चना मुसळे यांच्या प्रचार
कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी एम.डी
पाटील,दिवाकर शेट्टी,सुरेश सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या
अनेक कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कार्यक्रमाला
आमदार विजय काळे, परशुराम वाडेकर, मधुकर मुसळे, रोहन
कुंभार, अमोल कांबळे, सौरभ कुंडलिक, तुकाराम गाडे, विजय
शेवाळे, अनिल राक्षे, भीमराव गायकवाड आदींसह कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बापट म्हणाले की, रास्तभाव धान्य दुकानातून उपलब्ध होणारे धान्य लाभार्थ्यापर्यत पोहोचते की नाही हे तपासण्याची कोणतीही यंत्रणा याआधी नव्हती. मात्र, आम्ही आता यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली असून प्रत्येक रास्त भाव धान्य दुकानात पॉइंट ऑफ सेल हे बायोमेट्रिकवर आधारित उपकरण बसवले आहे, या माध्यमातून धान्यातील काळाबाजार रोखण्यात आम्हाला यश आले आहे .
ते पुढे म्हणाले की, पुण्याला स्मार्ट सिटी बनवून शहराचा संपूर्ण कायापालट करण्याचे ध्येय आम्ही समोर ठेवले आहे. पीएमआरडीए, स्मार्ट सिटी प्रकल्प, विकास आराखडा, आतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो यांसारख्या उपक्रमांना भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यावर गती मिळाली. गेल्या 25 वर्षांपासून गल्ली पासून दिल्ली पर्यंत काँग्रेसची सत्ता असूनही हे प्रश्न सुटले नाहीत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात स्थायिक झाले. पण त्यांना रस्ते,पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात महापालिका कमी पडली. यामुळं पुण्याचा विकास खुंटला. औंध येथे पाण्याच्या टाकीसाठी पोलिसांची जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून मी 1985 पासून महापालिकेच्या मागे लागलो आहे. त्यावेळी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो. पण आजतागायत महापालिकेने ही जागा उपलब्ध करून दिली नसल्याचे बापट यांनी सांगितले. तसेच या भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
भीमनगर येथे एसआरए प्रकल्प उभारणार
प्रभाग क्रमांक १९ येथे प्रचारासाठी पालकमंत्री बापट यांनी भेट दिली असताना लोहियानगर प्रमाणेच भीमनगर येथेही एसआरए प्रकल्प उभारून हा परिसर झोपडपट्टीमुक्त करणार असल्याचा शब्द त्यांनी मतदारांना दिला. ३५ वर्षाची घाण हटवणारच आणि विकासासाठी भाजपला निवडून आणणारच असा नारा उपस्थित कार्यकर्त्यानी यावेळी दिला.