पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या वीस वर्षात पुणेकर जनतेची निव्वळ फसवणूक केली असून पुणे शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता ” चला कारभारी बदलू या ” हा विचार कृतीत आणू या असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी कोथरूड येथील प्रभाग कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी केले.
आज प्रभाग १० बावधन खु.- कोथरूड डेपोच्या प्रभाग कार्यालयाचे पालकमंत्री बापट यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष योगेश गोगावले, भाजप उमेदवार दिलीप वेडे पाटील, श्रद्धा प्रभुणे, अल्पना वर्पे, किरण दगडे पाटील, उपस्थित होते.
बापट म्हणाले की, गेल्या २० वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेला खूप लुटले. पोकळ आश्वासने दिली. भ्रष्टाचाराचे थैमान घातले. आघाडी सरकारला जनतेचे कोणतेच प्रश्न मार्गी लावता आले नाहीत. उलटपक्षी केंद्रात आणि राज्यात सत्तेत येताच भारतीय जनता पक्षाने अनेक विकासकामे केली. आघाडी सरकारने वर्षानुवर्षे रखडवलेल्या अनेक योजना, प्रकल्प मार्गी लावले. दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवारासारखी महत्वाकांक्षी संकल्पना मांडली व तिला मूर्त रूप दिले. मी पालकमंत्री म्हणून पुणे जिल्ह्यातील ३०० गावांना भेट दिली. त्यांचा पाणी प्रश्न सोडविला. आज ही गावे टँकरमुक्त झाली आहेत.
ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्यांसाठी अनेक योजना आणल्या. महिला केंद्रबिंदू ठेऊन ५०० कोटींची उज्ज्वला योजना आणली. २३ कोटी शेतकऱ्यांची बँक खाती उघडली. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबावी व त्यांचा पैसा कोणाच्या ‘घशात’ न जाता शेतकऱ्यांच्या ‘खिशात’ जावा, हा यामागील हेतू होता. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिसाद देत १४ हजार कोटीच्या घरगुती गॅसचे अनुदान लोकांनी परत केले, असल्याचेही बापट यांनी यावेळी नमूद केले.
निवडणुकांमध्ये काही लोकांकडून पैशाचा नुसता बाजार मांडला जातो. त्यामुळे आपण दक्ष रहा. प्रलोभनांना भुलू नका. पूर्ण विचार करून आपले बहुमोल मत सक्षम उमेदवारास द्या. आपले प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेत योग्य लोकप्रतिनिधी पाठवा, असे आवाहन पालकमंत्री बापट यांनी जनतेला केले.