मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात अखेर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एन्ट्री घेतली आहे. अमित शहा थोड्याच वेळात महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार असून या बैठकीत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचे की नाही? यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटी बैठक सुरू होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि भाजपचे इतर नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्र भाजपने राज्याच्या सत्तेचा तिढा सोडवण्याचे सर्व अधिकार अमित शहा यांना दिले आहेत. त्यामुळे अमित शहा या बैठकीला संबोधित करणार आहेत. या बैठकीत शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद द्यायचे की नाही? शिवसेनेशी युती करायची की नाही? याचा निर्णय घेण्यात येणार आहे