पुणे : भारतामध्ये सर्वत्र सत्ता मिळो,महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत यश व विजय मिळो… संपूर्ण देशामध्ये सुख-समृद्धी नांदो… अशी प्रार्थना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दगडूशेठ गणपती चरणी अभिषेकातून केली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…अशा गणेशनामाच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केलेल्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने जे.पी.नड्डा यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा चे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही.सतिश, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सवप्रमुख व नगरसेवक हेमंत रासने, सुनील रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय पुण्याचे खासदार गिरीष बापट, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक यांसह स्थानिक नगरसेवक व भाजपा चे पदाधिकारीही उपस्थित होते.
पुण्यामध्ये लोहगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर जे.पी.नड्डा यांनी प्रथम दगडूशेठ गणपती मंदिरात येऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अभिषेक देखील केला. यामध्ये आगामी निवडणुकीत भाजपा ला यश मिळू देत, असे साकडे त्यांनी गणरायाला घातले. त्यानंतर गणरायाची आरती देखील केली. ट्रस्टतर्फे महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन अशोक गोडसे व हेमंत रासने यांनी नड्डा यांचा सन्मान केला.