पुणे-मतदार संघात फायबर ऑप्टीकलचे कामे करताना धमकी आणि त्रास देवुन दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी फोनद्वारे 50 लाखाच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सुमारे महिनाभराच्या पोलीस तपासानंतर आज सकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला . याबाबत स्वतः आ. टिळेकर यांनी हे ‘आपल्या विरुद्ध चे प्रचंड मोठे असे राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा करत पोलिसांच्या कारवाई विषयी संशय घेतला आहे .त्यांच्यावर भादवि 385, 379, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.यातील 385, 379 हि दोन्ही कलमे अजामीनपात्र अशी आहेत .यामुळे टिळेकर यांची अटक अटळ असल्याचे देखील मानले जाते . तर उद्या टिळेकर हे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविली जाते आहे . गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, ते यावर काय निर्णय घेतात यावर सारे काही अवलंबून असल्याचे सांगितले जाते .
रवींद्र लक्ष्मण बराटे (55, रा. सरगम सोसायटी, धनकवडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
दि. 7 ऑगस्ट ते दि. 7 सप्टेंबर दरम्यान कात्रज कोंढवा रोड या भागात फिर्यादीच्या कंपनीचे फायबर ऑप्टीक केबलचे काम चालू असताना आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि त्यांचा हस्तक गणेश कामठे यांनी वारंवार फोन करून व समक्ष भेटून त्यांच्या मतदार संघात फायबर ऑप्टीकचे काम करण्यासाठी वायर तोडणे, चोरून नेणे, धमकी देणे तसेच इत्यादी प्रकारे त्रास दिला. त्यांनी दि. 7 सप्टेंबर रोजी फोनव्दारे 50 लाखाची खंडणी मागितली .असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदार हे इ व्हीजन टेलि इन्ट्रा प्रा.लि. (मेंहदळे गॅरेज, एरंडवणा) येथे नोकरीस असुन ते पुणे शहरातील दक्षिण विभागात एरिया मॅनेजर म्हणुन काम करतात. कंपनीतर्फे शहरातील विविध पोलिस पोलिस ठाण्याचे इंटरनेट फायबर ऑप्टीक केबल मार्फत जोडण्याचे तसेच खासगी व्यक्ती व आय टी आय पार्क यांना शुल्क आकारून सेवा पुरविण्याचे काम केले जाते.
दरम्यान, गुन्हयाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

