राष्ट्रीय वयोश्री योजना कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई दि. २६ ऑगस्ट – महाविकास आघाडीला ना ज्येष्ठाची काळजी ना महिला व लहान मुलांची काळजी आहे. हे सरकार अंतर्गत कुरघोडीमध्ये व्यस्त आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी कार्य करण्यास कटीबद्ध आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात मदत व्हावी, हा या योजनेचा उद्देश असून देशभरात ही योजना राबवली जात असल्याची माहिती विधान परिषद विरोधी पक्षनेत प्रविण दरेकर यांनी दिली.
भाजपा मागाठणे विधानसभातर्फे राष्ट्रीय वयोश्री योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा सचिव विनोद शेलार, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, महामंत्री उत्तर मुंबई दिलीप पंडित, महामंत्री उत्तर मुंबई युनुस खान, उत्तर मुंबई सचिव मोतीभाई देसाई, अमित उत्तेकर, मंडळ अध्यक्ष दिलीप उपाध्याय, नगरसेविका आसावरी पाटील, सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
या योजनेचे लोकार्पण विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मागाठणे विधानसभेत खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या योजनेची अमलबजावणी सुरू करण्यात आली. राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ६० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना छडी, वॉकर, व्हिलचेअर, कानाचे मशीन, चष्मे, कृत्रिम दात, व्हिलचेअर कमोड सहित, ट्रायपॉड व पेट्रापॅाड इ. यंत्रे व उपकरणे देण्यात येणार आहेत. सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
दरेकर म्हणाले की, मुंबईसारख्या शहरात अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात अनेक समस्या भेडसावत असतात. या वयात शरीर साथ देत नाही. त्यामुळे त्यांना उत्तम आयुष्य जगता यावे याकरता यंत्रे व उपकरणे यांची आवश्यकता असते. परंतु उपकरणे महाग असल्यामुळे ती त्यांना घेता येत नाहीत. वडीलकीच्या भावनेतून आपल्याला या गोष्टी कोणी तरी दिल्या पाहिजेत, अशी ज्येष्ठ नागरिकांची इच्छा असते. त्या भावनेतूनच भाजप ही उपकरणे ज्येष्ठ नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देते. खऱ्या अर्थाने माणुसकीचा ओलावा आणणारा आजचा कार्यक्रम असल्याचे मत दरेकर यांनी व्यक्त केले.
दरेकर म्हणाले की, केंद्राच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देत महिला तरुण वर्गासाठीदेखील आपल्याला काम करायचे आहे. कोरोना संकट असो किवा निसर्ग वादळ, कोणत्याही संकटात भाजप कार्यकर्ता जनतेच्या सेवेकरता रस्त्यावर उतरला हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. आजही ज्येष्ठ नागरिकांची भाजप पक्षातील कार्यकर्ता कुटुंबातील सदस्यासारखा काळजी घेईल, अशी मला खात्री असल्याचे मत दरेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी कार्य करण्यास भाजप कटीबद्ध-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
Date:

