नवी दिल्ली-भाजपमुळेच मुंबई बाहेर शिवसेना वाढली असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते म्हणाले की, मुंबई सोडली तर महाराष्ट्रात शिवसेना कुणालाही माहिती नव्हती. शिवसेनेचे अस्तित्व केवळ मुंबईपुरतेच मर्यादित होते. मात्र भाजपचा हात धरुन, भाजपसोबत युती करुन शिवसेना राज्यभरात पसरली. हे केवळ आणि केवळ भाजपच्या साथीमुळे शक्य झाल्याचा दावा दानवे यांनी केला.
भाजपसोबत केलेल्या युतीत शिवसेनेची 25 वर्षे सडली, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्यावर आता रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच शिवसेना-भाजप युतीवर उद्धव ठाकरे कोणत्या अधिकाराने बोलत आहेत?, असा सवाल देखील दानवेंनी केला आहे.’शिवसेना आणि भाजपची युती काही उद्धव ठाकरे यांच्यामुळे झालेली नव्हती. तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन हे या युतीचे शिल्पकार होते. अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले की, काँग्रेसविरुद्ध लढण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. यात उद्धव ठाकरे यांचे कोणतेही योगदान नाही. त्यामुळेच त्यांनी याबाबत उगाच काहीही भाष्य करू नये’, असे म्हणत दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले आहे. शिवसेना-भाजप युती झाली तेव्हाची राजकीय स्थिती वेगळी होती.आम्ही एकत्र आलो नसतो तर काँग्रेससोबत ताकदीने लढू शकलो नसतो. त्या परिस्थितीने दोन्ही पक्षांना एकत्र आणले. उद्धव ठाकरेंचे म्हणाल तर तेव्हा ते शाळेत शिकत होते. राजकारणाचा साधा गंधही तेव्हा त्यांना नव्हता. असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.
निवडणूक लढल्यास काय स्थिती होते हे उद्धव ठाकरेंना चांगले ठाऊक
‘महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढल्यास काय स्थिती होते हे उद्धव ठाकरे यांना चांगले ठाऊक आहे. शिवसेनेने गुजरात, गोवा आणि उत्तर प्रदेश या राज्यांत निवडणुका लढल्या आहेत. केवळ तेथील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शिवसेना लढते. तिथे ते कधीच निवडणूक जिंकू शकलेले नाहीत’, असे दानवे यांनी सांगितले. हिंदुत्वावरूनही दानवे यांनी पलटवार केला.
बाळासाहेबांनी जो मार्ग दाखवला होता त्याच्या विरुद्ध दिशेने शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. शिवसेनेने आज हिंदुत्व सोडले असून सत्तेसाठी ते हिंदूविरोधी पक्षांसोबत गेले आहेत. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्वाबाबत कुणी प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. हिंदुत्वासाठी भाजपने काय केले आणि इतरांनी सत्तेसाठी हिंदुत्वाकडे कशी पाठ फिरवली, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

