येत्या दहा दिवसांत पालिकेकडून पाणीपुरवठा सुधारण्याचे आश्वासन-आमदार सिद्धार्थ शिरोळे
पुणे – गेल्या काही दिवसांपासून भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटे रोड, गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी, शिवाजीनगर गावठाण भागात कमी दाबाने पाणी येते, याकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवाजीनगरच्या वतीने महापालिकेच्या एसएनडीटी पाणीपुरवठा केंद्रासमोर आज (शुक्रवारी) उपोषण करण्यात आले.
कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे अनेकवेळा केल्या. पण, तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून काहीच कार्यवाही न झाल्याने भाजप, शिवाजीनगरच्या वतीने एसएनडीटी पाणीपुरवठा केंद्रासमोर उपोषण करण्यात आले. उपोषणात दत्ताभाऊ खाडे, रविंद्र साळेगावकर, शाम सातपुते, सुनील पांडे, आनंद छाजेड, गणेश बगाडे, प्रतुल जागडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सर्वांशी चर्चा केली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता प्रसन्न जोशी यांनी उपोषणाची दखल घेतली आणि भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटे रोड, गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी, शिवाजीनगर गावठाण या सर्व भागातील पाणीपुरवठ्यात येत्या दहा दिवसांत सुधारणा करु असे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

