मुंबई, दि. ९ एप्रिल – राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत सरकार विचार करत असताना व्यापारी, कष्टकरी, असंघटित कामगार यांना सरकारने कर सवलती, सूट आणि किमान 5 हजार रुपयांचे आर्थिक पॅकेज द्यावे, व्यापाऱ्यांचा माल विकला जाईल आणि सर्वसामान्यांना घरपोच माल मिळेल, असे मॅकेनिझम निर्माण करावे, तसेच, केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिल्या असल्या तरी राज्यात वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यपाल महोदयांनी केंद्राशी बोलून वाढीव लसी मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे निवेदन भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल महोदयांची भेट घेऊन त्यांना दिले असून ही भेट सकारात्मक झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यपालांची भेट घेतली, त्यांना राज्यातील कोरोना स्थितीची माहिती दिली. कोरोनाला आळा घालण्यासाठी कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे, लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे आहे, परंतु, राज्यातील छोटे व्यावसायिक, दुकानांमध्ये काम करणारे कष्टकरी, असंघटित कामगार यांनी मागील लॉकडाऊनमध्ये खूप सोसले आहे, आता पुन्हा लॉकडाऊन लावला तर ते देशोधडीला लागतील. त्यांना आधार देण्याची ठोस भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे. इतर राज्यांनी त्यांच्या राज्यातील कष्टकरी, कामगार, असंघटित कामगार, छोटे व्यावसायिक, रस्त्यावर व्यवसाय करणारे याना वेगवेगळी पॅकेजेस दिली होती, आपल्या सरकारने आतापर्यंत हातावर पोट असणाऱ्यांसाठी कोणतेही पॅकेज दिलेले नाही. त्यामुळे हा लॉकडाऊन लावण्यापूर्वी या कष्टकऱ्यांना किमान 5 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी आम्ही राज्यपाल महोदयांकडे केली, असेही दरेकर यांनी सांगितले.
गेल्या लॉकडाउनमध्ये व्यापारी घरपोच सेवा पुरवत होते व सामान्यांनाही आवश्यक माल घरपोच मिळत होता, यामधून छोटे व्यावसायिक स्वतःच्या पोटापाण्याचे प्रश्न सोडवत होते. अशा प्रकारचे मॅकेनिझम सरकारने तयार करावे, अशीही मागणी आम्ही निवेदनात केल्याची माहिती दरेकर यांनी दिली.
राज्यात कोरोना लसीबाबत सरकारमधील काही लोक केंद्राला दोष देण्याचे काम करीत आहेत, पण वस्तुस्थिती ही आहे की, केंद्राने सर्वाधिक 1 कोटी 6 लाख डोस महाराष्ट्राला दिले आहेत. तरीही राज्यात वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यपाल महोदयांनी केंद्राशी बोलून वाढीव लसी मिळवण्याचा प्रयत्न करावा, अशीही विनंती राज्यपाल महोदयांना केली असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या, उपाययोजना करण्यात आलेले अपयश, लॉकडाऊन लावणे, या सर्व परिस्थितीत मुख्यमंत्री भांबावलेल्या स्थितीत असल्यामुळे राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल महोदयांकडे आम्ही या मागण्या केल्या आहेत. केंद्राकडून लसींचे जादा डोसेस मिळवण्याबाबत देवेंद्रजी फडणवीस देखील केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत. राज्यपाल महोदयांनी सुद्धा हस्तक्षेप करून जादा लसी मिळवण्याचा प्रयत्न करावा, या सर्व मागण्यांसाठी आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेतली, असे दरेकर म्हणाले.
राज्यपाल महोदयांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, पराग शहा विद्या ठाकूर, पराग अलावणी व इतर आमदार आणि भाजपाचे लोकप्रतिनिधी यांचा समावेश होता.
कष्टकरी, असंघटित कामगारांना कर सवलती, सूट आणि किमान 5 हजार रुपयांचे आर्थिक पॅकेज द्या-भाजपा शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
Date:

