पुणे : राज्य सरकारने पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी व्हावी म्हणून काही एक केलेले नाही. कोरोना संकटात महाविकास आघाडी सरकारने आजतागायत पुण्याकडे दुर्लक्ष केले आहे असा गंभीर आरोप पुणे भाजपने केला आहे. तसेेेच मदत करण्याऐवजी राज्य सरकार लॉकडाऊनचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र, त्याला आमचा पूर्ण विरोध असणार आहे. साथीचे रोग ही राज्य सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे राज्य सरकारने पुणे महापालिकेला ५०० कोटी रुपये द्यावे अशी मागणीही यावेेळी भाजपने केेली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहर भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला सूचना केल्या. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, माजी आमदार बापूसाहेब पठारे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, सुशील मेंगडे यावेळी उपस्थित होते. यानंतर शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि खासदार गिरीश बापट यांनी बैठकीची माहिती दिली.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, ‘महापालिका चांगले काम करीत आहे परंतु राज्य सरकारची भूमिका दुर्दैवी आहे. पुण्याकडे राज्य सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. जम्बो कोविड सेंटरही महापालिका करीत आहे. पुणे शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाजपची मागणी आहे.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘साथीची जबाबदारी राज्य सरकारची आहे. महापालिका म्हणून आम्ही ती टाळत नाही. परंतु राज्य सरकार मदत करत नाही. आता कुठे आर्थिक घडी पूर्वपदावर येत आहे. लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर करावे. महापालिकेला साथ आटोक्यात आणण्यासाठी ५०० कोटी रुपयांची राज्य सरकारने मदत करावी. मात्र राज्य सरकारची मानसिकता लॉकडाउन करण्याची आहे. भारतीय जनता पार्टीचा लॉकडाउनला पूर्ण विरोध आहे. वेळ आल्यास रस्त्यावर उतरून आम्ही विरोध करू.’
खासदार बापट म्हणाले, ‘आज शहर भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त आणि अधिकार्यांची भेट घेतली. शहरातील कोरोना चाचण्या वाढविणे, लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक असल्याच्या सूचना आम्ही केल्या. काही खासगी रुग्णालयांनी आहे त्या जागेत मशिनरी उपलब्ध करून बेड वाढविण्याची तयारी दर्शविली आहे. लसीकरणाची केंद्र वाढविण्यात येणार आहेत.’
बापट पुढे म्हणाले, ‘सध्या व्हेंटिलेटरची गरज आहे. आता ऑर्डर दिल्यास व्हेंटिलेटर पंधरा दिवसांनंतर उपलब्ध होतील. त्यापेक्षा तयार आहेत ते व्हेंटिलेटर तातडीने घेणार आहोत. आजच शहराला केंद्र सरकारकडून दीड लाख लस मिळाल्या आहेत. त्यामुळे दररोज २० हजारापर्यंत लसीकरण करणे शक्य होणार आहे. महापालिकेत आणि क्षेत्रिय स्तरावर कंट्रोल रूम कार्यरत आहेत. या ठिकाणी २४ तास अधिकारी उपलब्ध असतात. व्हायरसच्या बदलत्या ट्रेंटमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु नागरिकांनी घाबरून जाऊ नये. महापालिका पूर्ण क्षमतेने साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज खासदार निधीतून एका ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण केले. महापौरांच्या निधीतून पाच आणि खासदार निधीतून अजून ११ ऍम्ब्युलन्स उपलब्ध होणार आहेत. राज्य सरकारने मदतीचा हात पुढे करावा आणि निधी उपलब्ध करून द्यावा.’

