नवी दिल्ली : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हण होते. व पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही ब्राम्हण आहेत असे वादग्रस्त वक्तव्य गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. गांधीनगर येथे समस्त गुजरात ब्राह्मण समाज संस्थेतर्फे ब्राम्हण बिझनेस समिट आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेलही उपस्थित होते.
राजेंद्र त्रिवेदी म्हणाले,ब्राम्हण कधीच सत्तेचे लोभी नव्हते. त्यांनी अनेक राजे घडवले. मी हे नेहमीच सांगत आलो आहे की, ब्राम्हणानीच अनेकांना देवत्व मिळवून दिले आहे. श्रीराम हे क्षत्रिय होते, पण ऋषी-मुनींनी त्यांना देव बनवले. असे म्हणून ते पुढे म्हणाले, जो कोणी शिकतो तो ब्राह्मणच असतो. त्यामुळे आंबेडकर हेदेखील ब्राह्मणच होते, हे म्हणणे मला चुकीचे वाटत नाही. सर्व शिक्षित लोक हे ब्राह्मणच असतात हे म्हणणे यामुळे चुकीचे ठरत नाही. याच संदर्भात मग पंतप्रधान मोदी हेदेखील ब्राह्मणच आहेत, हे सांगायला मला अभिमान वाटतो, असेही त्रिवेदी म्हणाले.

