पुणे – पुण्यात निवडणुकीपूर्वी सिंहगडावर सर्व पदाधिकारी स्थानिक नेते आणि उमेदवारांना नेवून तिथे शपथ घेणारे ,तसेच निवडणुकीच्या काळात भाजपच्या कार्यालयाचे सर्वांना समवेत घेवून उद्घाटन करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज मात्र पुण्यातील पक्षांतर्गत भांडणावर बोलणे टाळले ,पुण्यातील भांड्नाबाबत काहीच कल्पना नाही असे सांगितले … तर नारायण राणे आणि अमित शाह यांची दिल्ली येथे माझ्या निवासस्थानीच भेट झाली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभाची निमंत्रण पत्रिका दिली. तसेच त्यावेळी राणे यांच्या भाजपप्रवेशाची राजकीय चर्चाही झाली आहे. मात्र, राणेंच्या पक्षप्रवेशासंबंधीचा निर्णय योग्य वेळी जाहीर करू, अशी माहिती दानवे यांनी दिली.
भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्ताने दानवे बुधवारी पुण्यात आले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
दानवे पुढे म्हणाले, आंदोलन करणे, मोर्चे काढणे राजकीय पक्षांचे कामच असते. त्यामुळे राज्यात निघत असलेले मोर्चे म्हणजे सरकारविरोधी जनतेत असंतोषाचे वातावरण आहे, असे म्हणता येणार नाही. तसेच सरकार म्हणून शिवसेना आणि भाजप उत्तमप्रकारे काम करत आहेत. राजकीय पक्ष म्हणून शिवसेना मोर्चे काढत असेल तर तो पक्ष वाढविण्याचा एक भाग आहे. मराठा मोर्चा आणि कर्जमाफी यानंतर आम्ही सर्वे घेतला आहे, यात पक्षाला पोषक वातावरण असल्याची प्रतिक्रीया दानवे यांनी दिली.
पुण्यातील भांडणाबत कल्पना नाही..
पुणे भाजपमध्ये नवे आणि जुना असा वाद सुरू आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना निवृत्त करावे असे संघाचे धोरण असल्याची माहिती संजय काकडे यांनी दिली होती. यावर विचारले असता, याबाबत मला काहीच माहित नाही. अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी बोलण्याच्या ओघात भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची बावळट म्हणून ऑगस्ट महिन्यात संभावना केली होती. दानवे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत त्या वक्तव्याचे पडसाद उमटले.”या वक्तव्याची प्रदेश भाजपने काही दखल घेतली का,’ अशी पत्रकारांनी दानवे यांना विचारणा केली. त्यावर “हे वक्तव्य मी ऐकले नाही आणि वाचलेही नाही’ असे उत्तरे दानवे यांनी दिले. त्यावर हशा पसरला अन् पालकमंत्री गिरीश बापट तुम्हाला शहरातील काही माहिती देत नाहीत का,’ असे पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावर बापट आणि दानवे दोघांनीही हसून प्रश्नाचे उत्तर टाळले. मात्र, टीव्ही चॅनेल, फेसबुक, व्हॉटस ऍप आदी माध्यमांवरही सहयोगी खासदारांचे वक्तव्य प्रसिद्ध झाले ते समजले नाही का असाही प्रश्न दानवे यांना विचारण्यात आला.पक्ष किंवा त्यातील लोकप्रतिनिधींबद्दल शेरेबाजी करू नये, अशी किमान समज तरी पक्षाने खासदार काकडे यांना दिली का, असे विचारले असता, दानवे यांचा धरून ठेवलेला पेशन्स संपला… “अन् आता मी खरं बोलू का’ असे त्यांनी म्हटले. त्यामुळे पत्रकारांचे कान टवकरले गेले. परंतु, क्षणभर पसरलेल्या शांततेचे गांभीर्य लक्षात आल्यावर दानवे यांनी विषयला बगला दिली आणि हसतमुख चेहरा दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी सज्ज केला.पत्रकार परिषदेनंतरही संजय काकडे यांच्याबाबत दानवे यांनी बाळगलेले बोलके मौन हा उपस्थित नेत्यांत चर्चेचा विषय झाला होता