पुणे:
बाल दहशतवादाची समस्या आणि त्यावरील भाष्य मांडणारा पहिला हिंदी सिनेमा ‘बिल्लू उस्ताद’ चा मुहूर्त पुण्यातील ‘आर्यन स्कूल’ परिसरात पार पडला. ‘नारायण फिल्मस्’ तर्फे तयार होत असलेल्या या फिल्मची निर्मिती शंतनू सिंह यांनी केली असून, सुवाहदन आंग्रे हे दिग्दर्शन करीत आहेत.
मुहूर्त प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रावण कुमार, ‘महाराष्ट्र अॅण्टी टेररीझम स्क्वाड’चे सहायक पोलीस आयुक्त भानू प्रसाद बर्गे, महापौर दत्तात्रय धनकवडे, पोलीस निरीक्षक तांबे, लेखक मनोज पांडे, अभिनेत्री मिथिला नाईक, स्नेह अरुण उपस्थित होते.
अनाथाश्रमात राहणारा धाडसी मुलगा ‘बिल्लू’ आणि त्याच्या बरोबरचा मित्र यांच्याभोवती हा सिनेमा फिरतो. त्यांचे अपहरण दहशतवादी करतात आणि त्यांना दहशतवादी कारवायांना प्रवृत्त करतात. या कारवाया पुढे बिल्लू कशा हाणून पाडतो, यावर चित्रपटाची कथा आहे.
प्रियांशू चॅटर्जी, मिथिला नाईक हे मुख्य भूमिकेत आहेत. संगीत दिग्दर्शन श्रीरंग आरस यांनी केले आहे. गीते सचिन निकम व दिनेश मंग्रा यांची आहेत.
‘विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण समाजाला संदेश देणार्या सामाजिक चित्रपटाची निर्मिती हे माझे स्वप्न होते.’ असे निर्माते शंतनू सिंह यांनी सांगितले.
सुवाहदन आंग्रे म्हणाले, ‘अत्यंत वेगळ्या विषयावरची ही निर्मिती आहे. अनाथगृहातील विद्यार्थ्यांच्या व्यथाही या निमित्ताने सर्व प्रेक्षकांसमोर येतील आणि हा चित्रपट सर्वांना अंतर्मूख करेल’ असे मनोगत दिग्दर्शक सुवाहदन आंग्रे यांनी व्यक्त केले.
या चित्रपटासाठी कैलास खेर, वैशाली सामंत यांच्या गाण्याचे ध्वनीमुद्रण देखील पूर्ण करण्यात आले आहे.


