मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, ता. ३ : आपल्या देशाचा गौरवशाली वारसा आणि समृद्ध परंपरांची ओळख करून घेऊन त्याची जपणूक करण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मत सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या ‘अस्तित्व एक तप’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे उद्घाटन करताना गाडगीळ बोलत होते. प्रभारी प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित अध्यक्षस्थानी होत्या.
भारतीय वारसा आणि परंपरेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेचे हे बारावे वर्ष होते. विविध १७ प्रकारच्या ऑनलाइन स्पर्धांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांसह १८९६ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
‘सकारात्मकतेद्वारे उत्पादकता, कौशल्याद्वारे सर्जनशीलता’ हे स्पर्धेचे ब्रीद होते. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मरणार्थ स्वरालंकार, प्रश्नमंजुषेसाठी भारतरत्न, मुखवट्यांसाठी प्रादेशिक संस्कृती आणि नृत्य, चित्रकलेसाठी पंढरीची वारी, ट्रेजर हंटसाठी महाभारत या वैशिष्ट्यपूर्ण विषयांसह निबंध, वक्तृत्व, छायाचित्रण, नृत्यालंकार आदी स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळाला.

